माखजन भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो रुपयांची हानी

0

आरवली : माखजन भागात झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा नारडुवे येथील घरांना बसला आहे. येथील अनेक घरांना तडे पडले असून ग्रामस्थ मुठीत जीव धरुन घरात राहत आहेत. याशिवाय माखजन भागातील शेकडो हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले असून महसुल विभागाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. कोंडिवरे येथील नळ पाणी योजनेचे पंप हाऊस कोसळून लाखो रुपयांची हानी झाली आहे. या झालेल्या नुकसानीची साधी पाहणी सुद्धा महसूल विभागाकडून करण्यात न आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माखजन जवळील नारडुवेे या गावालाही अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. या गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेच आहे. परंतु अनेक घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे. चंद्रकांत कांबळे, गंगाबाई कांबळे, गणपत जोगले, लक्ष्मी जोगले, धोंडू मुदगल अदींच्या घरांना तडे गेल्याची माहिती सरपंच श्रीधर जोगले यांनी दिली. घरांना तडे गेल्याचे प्रशासनाला कळवूनही अद्याप प्रशासन या दुर्गम भागात पोहचले नसल्याने सखेद आश्‍चर्य तसेच संतापाची भावना अनेकांनी व्यक्त केली. माखजन आणि आरवली परिसरात अतिवृष्टी झाल्याने गडनदीला आलेल्या पुराचे पाणी 14 दिवस माखजन बाजारपेठेत कायम होते. यामुळे येथील व्यापार तसेच जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागातील शेतीतही केव्हा नव्हे एवढे पाणी वीस पेक्षा अधिक दिवस थांबून होते. पूराचे पाणी ओसरल्यावर भात शेतीचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पूर्ण शेती लाल पडून कुजली आहे. शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली असल्याने आरवली, मुरडव, कोंडिवरे, बुरंबाड, सरंद, कासे, कळंबुशी, माखजन, धामापूर, नारडुवे, असावे, पेढांबे आणि करजुवे भागातील शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची साधी पाहणी सुद्धा महसुल विभागाकडून करण्यात आलेली नाही. यामुळे महसुल खात्याच्या उदासीन कारभारासंदर्भात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विभागाने झालेल्या भात शेतीचे त्वरित पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीचा तडाखा मोठ्या प्रमाणावर कोंडिवरे गावालाही बसला. गडनदीला आलेल्या पुराचा प्रवाह बदलल्याने स्वजलधारा नळपाणी योजनेचे पंप हाऊस जमीनदोस्त झाले आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील साईवाडीतही पुराचे पाणी शिरले होते. माखजन आणि आरवली भाागात झालेल्या अतिवृष्टीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना अद्याप प्रशासन निद्रिस्तच असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here