दि.२६ ऑगस्टला होणार म्हाडा प्राधिकरणाची उच्चस्तरीय बैठक

0

रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांना मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाची उच्चस्तरीय बैठक दि.२६ ऑगस्टला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. म्हाडा प्राधिकरणाची बैठक म्हाडा भवनाच्या बाहेर प्रथमच घेण्याचा धाडसी निर्णय आपण घेतल्याचे म्हाडाध्यक्ष आ. उदय सामंत यांनी सांगितले. म्हाडामार्फत राज्यातील विविध भागात मोठमोठे प्रकल्प राबविले जात आहे. म्हाडा अध्यक्षपदाचा मान कोकणाला प्रथमच मिळाला आहे. म्हाडाच्या माध्यमातून कोकणपट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी म्हाडाचा मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रस्तावांबाबत बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी संजय गुप्ता, नितीन करीन, उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई म्हाडा अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यासह म्हाडाच्या विविध कमिटींचे अध्यक्ष, सचिव राधाकृष्ण बी., डीजी श्री.वर्मा यांच्यासह ५० अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गणपतीपुळे विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. १०० कोटी खर्च करून परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. परंतु प्रशासनाने भूमीपूजनापूर्वीच कामाला सुरूवात केली आहे. सात मीटरच्या रस्त्यावर पाच मीटरची कमान उभारण्यात आली आहे. हे काम शिवसैनिकांनी बंद पाडले, मी त्यांचे कौतुक केले आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाल्यास त्याला शिवसैनिक विरोध करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपण स्वतः तेथे पाहणी केली असून चुकीच्या पद्धतीने झालेले काम बंद करून नव्याने काम करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या ३६ गाळेधारकांना गाळे मिळाले पाहिजे. एकही व्यावसायिक गाळयांशिवाय वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे आ.सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी तालुक्यात पूरग्रस्तांचे चुकीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पूर आला तेव्हा अधिकारी पूरग्रस्त घरांमध्ये गेले होते? तलाठ्यांनी काही ठिकाणी घरांची बाहेरुन पाहणी करुनच पंचनामा तयार केला असल्याची माहिती पुढे आली आहे. याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आ.सामंत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here