रायपाटण ग्रा. रूग्णालय अपुऱ्या वैद्यकीय सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा

0

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालय अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे मृत्यूशय्येवर आहे. त्यामुळे येथील रूग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबात अर्ज, निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी रायपाटण ग्रा. पं. व ग्रामस्थांनी राजापूर ओणी पाचल अणुस्कुरा राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निणर्य घेतला आहे. मागील ३० वर्षात प्रशासनाकडून या रूग्णालयाला पुरेशा प्रमाणात सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या रूग्णालयाच्या कार्यक्षेत्रात पाच प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून सुमारे ६० ते ६५ गावे आरोग्य सेवेसाठी या रूग्णालयावर अवलंबून आहेत. असे असतानाही या रूग्णालयात पूरेसा कर्मचारी वर्ग अथवा सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे रूग्णाची फार मोठी गैरसोय होत आहे. या रूगणालयात चार वैद्यकीय अधिकारी पदे मंजुर असून गेली अनेक वर्षे येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. कायमस्वरूपी क्ष किरण तंत्रज्ञ नाही, ईसीजी मशिन नाही, डेंटिस्ट नाही, सोनोग्राफी मशिन वापराविना सडत आहे. रूग्णालयाला पावसाळ्यात गळती सुरू असून रूगणालय दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रूग्णालयाची संरक्षक भिंत कोसळलेली आहे. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत रायपाटण ग्रामीण रूग्णालय अडकले आहे. सध्यातर बाहय रूग्णसेवा फक्त सोमवार व गुरूवार या दोन दिवशीच सुरू असते. रूग्णालयातील या समस्यांबाबत रायपाटण ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने निवेदने देण्यात आली आहेत. तसेच २६ जानेवारी २०१९ रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यावेळीही प्रशासनाने आश्वासनाखेरीज कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here