रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेतर्फे आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये कॅमेरापूजन करण्यात आले. दोन दिवस आयोजित किड्स फोटोग्राफी प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे, विनय बुटाला, नितीन हेगशेट्ये, सचिन झगडे, सपना देसाई, वैभव घाग आदींनी दीपप्रज्वलन व कॅमेरापूजन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष साईप्रसाद पिलणकर, सचिव सुबोध भोवड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख तथा प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, नगरसेवक रोशन फाळके यांनी या कार्यक्रमास भेट देऊन सर्व छायाचित्रकारांचे कौतुक केले. या वेळी स्मार्ट डिजीटल लॅब आणि पवन डिजिटल प्रेस यांनी विविध प्रकारचे अल्बम व फोटोफ्रेम आदींचा स्टॉल लावला होता. त्यालाही छायाचित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
छायाचित्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चासत्र झाले. यामध्ये व्यवसायातील नवे ट्रेंड, नवीन प्रकारचे अल्बम, सॉफ्ट कॉपी, ग्राहकांशी चांगले संबंध कसे ठेवावे, ग्राहकांचे आलेले अनुभव याविषयी चर्चा झाली. डिजिटल युगात छायाचित्रकारांसमोर नवी आव्हाने उभी आहेत, त्याला तोंड देण्यासाठी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे, नवे कॅमेरे, साधनसामग्री घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
