बासेल (स्वित्झर्लंड) : भारतासाठी दोन रौप्यपदकांची कमाई करणार्या पी. व्ही. सिंधूच्या नजरा आजपासून सुरू होणार्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याकडे असणार आहेत. सिंधूने गेल्या काही वर्षांत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सलग दोन रौप्यपदक व इतक्याच कांस्यपदकाची कमाई करीत आपल्या कमागिरीत सातत्य ठेवले आहे; पण यावर्षी मात्र तिचा प्रयत्न पदकाचा रंग बदलण्यावर असणार आहे. भारताच्या या 24 वर्षीय खेळाडूने नेहमीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे व दोन वेळा तिने अंतिम फेरी गाठली आहे. 2017 च्या स्पर्धेत 110 मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराकडून तिला पराभूत व्हावे लागले व 2018 च्या स्पर्धेतील अंतिम लढतीत ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनने तिला पराभूत केले. पाचव्या मानांकित सिंधूने गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. या भारतीय खेळाडूला पहिल्या फेरीत चाल मिळाली आहे आणि आपल्या मोहिमेची सुरुवात चीन तैपेईच्या पाई यु पो व बुल्गेरियाच्या लिंडा जेचिरी दरम्यान होणार्या सामन्यातील विजेत्याशी होईल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य व कांस्यपदक जिंकणारी आठव्या मानांकित सायना नेहवालचा सामना स्वित्झर्लंडच्या सबरिना जाकेट व नेदरलँडस्च्या सोराय डे व्हिच एजबर्गन यांच्यातील सामन्यामधील विजेत्याशी होईल. पुढच्या फेरीत तिचा सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टशी होण्याची शक्यता आहे. तर, या सामन्यात विजय नोंदविल्यास सायनाची गाठ चीनच्या चेन यु फेईशी होऊ शकतो.
