”वर्षभरही राहण्याची शक्यता असलेल्या कोरोना संकटासाठी मानसिकता घडवा”

0

रत्नागिरी : कोरोनाचे संकट एक-दोन महिन्यांसाठी नव्हे, तर वर्षभरही सुरू राहणार आहे. त्यासाठी आपली मानसिकता तयार केली पाहिजे. काया, वाचा आणि मनाचे तप या काळात प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांनी व्यक्त केले.
कोरोना आणि ढासळत्या मानसिकतेविषयीच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी पोलिसांच्या फेसबुक पेजवरून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. ढगे म्हणाले की, कोरोना हे जागतिक संकट आहे. या काळात समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्वरूपाच्या आहेत. मात्र त्यावर आपण मात केली पाहिजे. नैराश्य, हतबलता किंवा त्यातून आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. या आजाराने प्रत्येकाला काहीतरी शिकविले आहे. त्याकडे डोळसपणाने पाहिले पाहिजे. कोरोनासारख्या आपत्तीमध्ये अचानकच मेडिटेशन, योगा, संगीत इत्यादींचा लगेच उपयोग होत नाही. भावना सौम्य असतील, तेव्हाच त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणूनच आयुष्यात दररोज एक तास खेळेन, गाणे, योग, क्रिएटिव्ह उपक्रम करेन, असे ठरवून दिनक्रम ठरवला पाहिजे. त्यामुळे निराश येणार नाही. भूक लागेल तेव्हा लोणचे-पापड उपयोगी ठरत नाही. तेव्हा जेवणच हवे. त्यामुळे मानसिक संतुलन सतत ठेवले पाहिजे. आधी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे आणि नैराश्याने ग्रासलेल्यांना त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावेत. निराश झालेल्याला, आत्महत्येला प्रवृत्त झालेल्याला त्यातून बाहेर येण्यासाठी मदत करावी. आता एकदम शक्य नसले, तरी कायिक, वाचिक आणि मानसिक तप आचरणात आणले पाहिजे. म्हणजे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ४५ मिनिटे, आठवड्यातून पाच दिवस नियमित व्यायाम, साखर, तेल आणि मिठाचे प्रमाण अतिरिक्त नसेल असा संतुलित आहार, जेवणाच्या वेळा पाळणे, दररोज पाच ते आठ तास झोप घ्यावी. मनाच्या आरोग्यासाठी प्रयत्न करावेत. छंद जोपासावेत. समाजासाठी काहीतरी करावे. मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे. आपण काय बोलतो, कोणाशी बोलतो, कसे बोलतो, याकडे लक्ष द्यावे. नेहमी सकारात्मक विचार करावा. कारण जसे आपण बोलतो, तसाच मेंदूचा प्रतिसाद मिळत असतो. हे तप केले, तर कोरोनाच काय पण कोणत्याही अनिश्चिततेला आपण तोंड देऊ शकतो. शाळा, महाविद्यालय आणि अभ्यासाबाबत खूपच गोंधळ निर्माण झाला आहे. पण पालकांनी विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा बाळगू नयेत. मुलांना समजून घ्यावे. नापास होणारे, अपेक्षेपेक्षा एखादा टक्का म्हणजे अगदी ९९ टक्के गुण मिळूनही एक गुण हुकल्याचे दडपण असलेले आणि काठावर पास होणारे विद्यार्थी असतात. हुकणाऱ्या गुणांकडे नव्हे, तर मिळालेल्या गुणांकडे लक्ष केंद्रित करायला हवे. एखादा विद्यार्थी किंवा व्यक्तीही निराशेकडे झुकत असेल, तर त्याचे समुपदेशन करायला हवे. अपयश आले किंवा कमी गुण मिळाले, किंवा रोजगार गेला, म्हणजे आयुष्य संपले असे नाही, तर खूप काही शिल्लक आहे, नव्या संधी आहेत, असा विचार करायला हवा, असे डॉ. ढगे यांनी सांगितले. मधुमेह, रक्तदाब असलेले रुग्ण, सर्वसामान्य व्यक्तींनी काय केले पाहिजे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
श्री. अनिल विभूते म्हणाले की, कमी गुण मिळाले, म्हणून मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी निराश न होता मिळाले, त्यात आनंद व्यक्त केला पाहिजे. गुण म्हणजे आयुष्य हा समज बदलला पाहिजे. पुढे यश कसे मिळेल, यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
श्री. गणेश इंगळे म्हणाले की, अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलिसांनी दहावी-बारावीला कमी गुण मिळून किंवा नापास होऊनही जिद्द सोडली नव्हती. म्हणून ते पुढे यशस्वी झाले. आपल्याकडे बुद्धिमत्ता असतेच. तिचा कसा, किती वापर आपण करतो, यारव यश अवलंबून असते. भरपूर संधी दार ठोठावत असतात. त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. प्रामुख्याने दहावी-बारावीला असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे लक्षात ठेवावे. कोरोना हा आपण आणलेला नाही. त्यामुळे टोकाची भूमिक घेऊ नये. जगासाठी आपण एक व्यक्ती असलो, तरी आपल्या कुटुंबासाठी आपण जग असतो. त्यामुळे मनोबल वाढवले पाहिजे. करोनाच्या काळातही गावागावांत रुग्णांच्या बाबतीत आयसोलेशन, क्वारंटाइन करण्याबाबत भीती निर्माण झाली. त्यामुळे त्यांचे करोनाबाधितांकडे पाहायचा दृष्टिकोन नकारात्मक होता. करोनाबाधितांना आपण गंभीर गुन्हा केला आहे, आपल्याला भयानक आजार झाला आहे, मोठी चूक केली, असे वाटू लागले. ते अयोग्य आहे. करोनाबाधित व्यक्तीही आपलीच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शरीरावरच्या जखमा बऱ्या होतात. पण मनावरच्या, तुच्छतेच्या वागणुकीमुळे झालेल्या जखमा बऱ्या होत नाहीत, हे सतत लक्षात ठेवावे. करोना संकटाकडेही सकारात्मकतेने पाहावे. त्याने प्रत्येकाला काहीतरी शिकविले आहे. त्यामुळे नकारात्मकता बाजूला ठेवून, सकारात्मकेने पाहायला शिकवले. कुटुंबासाठी वेळ द्यायला शिकवले आहे. एकलकोंडेपणा दूर करायला शिकवले आहे.
ट्विटर, हेल्पलाइन, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांमधून पोलीस दल कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी सदैव सज्ज आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘फक्त तू खचू नकोस’ या कवितेने त्यांनी या सत्राचा समारोप केला. तसेच पुढच्या आठवड्यात वेगळा विषय घेऊन पुन्हा फेसबुक लाइव्ह कार्यक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 16-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here