मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा या पुणे विभागातील पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली. आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले असून या भागातील एक हेक्टर (अडीच एकर) पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. तसेच घरांची पडझड झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आज, सोमवारी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदीत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे, पण त्यांनी कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांना तिप्पट नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तसेच, या पुरात अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. ज्यांची घरे पडली आहेत, त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून निवा-यासह अतिरिक्त एक लाख रुपयांची भरपाई देखील दिली जाणार आहे. ते पुढे म्हणाले की, तीन महिन्यांसाठी सरकारकडून धान्य दिले जाणार आहे. ग्रामीण भागात २४ हजार रुपये, तर शहरी भागात ३६ हजार रुपये घर भाडे दिले जाणार आहे. तसेच ज्यांना गावे दत्तक घ्यायची आहेत, त्यांना सरकारतर्फे मदत केली जाणार आहे. अशीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
