रत्नागिरीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रीराम खातू यांचे रविवारी रात्री निधन झाले. मृत्यु समयी ते ६४ वर्षांचे होते. मोहन श्रीराम खातू यांनी ३० वर्षांपूर्वी मारूती मंदीर येथे गोणपाटाचे झडप असलेले हॉटेल गोपाळ सुरू केले. हेच गोपाळ हॉटेल कालांतराने सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरले. रत्नागिरीतील सामाजिक चळवळीत मोहन खातू यांचा मोठा हातभार होता. मनमिळावू स्वभाव आणि चळवळीचे नेते म्हणून मोहन खातू यांची रत्नागिरीत ओळख होती. राष्ट्रसेवा दल, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, साहित्य चळवळ, कोमसाप यांच्या बैठका नेहमी हॉटेल गोपाळच्या कट्ट्यावर होत असल्याने इथल्या कट्टयाला ऐतिहासिक अस महत्व आले होते. मोहन खातू यांना ट्रेकिंगची मोठी हौस होती. रत्नदूर्ग माऊंटेनिअर्समध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. सह्याद्री, महाबळेश्वर येथील ट्रेकिंग त्यांनी यशस्वी केली. हिमालय-नेपाळ मधील १२० कि. मी. चा ट्रेक त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला होता. रत्नागिरीतील भगवती येथील गुहा साफसफाई करून ती पर्यटकांनी खुली करून देण्यात मोहन खातू यांचा मुख्य सहभाग होता. मारूती मंदीरचे ते ट्रस्टी होते. या ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सहभाग असायचा. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून,भावंडे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
