अखेर डिस्नेच्या अॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाने या रविवारी आणखी एक विक्रम स्वतःच्या नावाने नोंदवला. हा चित्रपट आता जगात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. या विक्रमामुळे ‘एंडगेम’ने जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘अवतार’ या चित्रपटाचा सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडला आहे. ‘अवतार’ विक्रम 9 वर्षे अबाधित होता. मार्व्हल स्टुडिओजचे प्रमुख केविन फायगी यांनीच अधिकृतरीत्या ही माहिती दिली आहे.
‘अवतार’चे ग्लोबल बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे 2.78 बिलियन डॉलर्स (19,210 कोटी रु.) इतके. 9 वर्षे हा कमाईचा हा विक्रम अबाधित होता. मार्व्हलच्या चित्रपटांइतकीच जितकी उत्सुकता दर्शकांना असते तितकीच उत्सुकता चित्रपटाच्या शेवटी असणार्या पोस्ट क्रेडिट सीनचीही असते. मात्र, अॅव्हेंजर्स एंडगेममध्ये कोणताही पोस्ट क्रेडिट सीन नव्हता. त्यामुळे काही रसिक नाराजही झाले होते. तथापि, पोस्ट क्रेडिट सीनसह अॅव्हेंजर्स एंडगेम 28 जूनला पुन्हा प्रदर्शित केला गेल्याने त्याची चित्रपटाची कमाई वाढली. एंडगेमचे आत्तापर्यंतचे ग्लोबल बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे 2.79 बिलियन डॉलर्स. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा हा 22 वा चित्रपट आहे. गतवर्षी आलेल्या ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चा उत्तरार्ध असल्याने या चित्रपटाची वर्षभरापासून प्रचंड उत्सुकता होती.