प्रवाशांना एसटीचे ‘लोकेशन’ समजणार

0

रत्नागिरी : एसटी आगारात किंवा स्थानकात वाट पाहत तिष्ठत उभे राहिलेल्या प्रवाशांना आता आपल्या गाडीचा ठावठिकाणा (लोकेशन) बसल्या जागी समजणार आहे. जिल्ह्यातील दोन डेपोंमधील एसटी गाड्यांवर ही यंत्रणा बसवण्यात आली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षांपासून ‘व्हीटीएस’ यंत्रणेवर काम करत आहे. एसटी स्थानकात किंवा आगारात उशिरा येण्यामागे अनेक कारणे असतात. त्याचा परिणाम अन्य बस सेवांवर होतो. एसटीचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांनाही बसची सद्य:स्थिती समजण्यास मदत मिळावी, हे व्हीटीएस अंमलबजावणीमागील उद्देश आहेत. एखाद्या नियोजित किंवा अधिकृत थांब्यावरही बस न थांबल्यास त्याची माहितीही यामुळे महामंडळाला समजेल व त्या बस चालक किंवा वाहकावर कारवाईही करता येणे शक्य होणार आहे. महामंडळाने 18 हजार बसगाड्यांपैकी प्रथम नाशिक विभागासह अन्य काही मार्गावरील  चार हजार बसगाड्यांना व्हीटीएस यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसवली. प्रवाशांसाठी सुविधा अमलात आणण्याऐवजी सुरुवातीला महामंडळाकडून त्याचा आढावा घेण्यात येत होता. आता प्रत्यक्षात प्रवाशांसाठीदेखील ऑगस्ट महिन्यात सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि रत्नागिरी डेपोमधील 125 गाड्यांमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. पुढील काही दिवसात ही यंत्रणा सुरू होऊन प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here