राज्याच्या महसूल ताफ्यात नवीन अडीच हजार तलाठी

0

मुंबई : राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी संवर्गातील २३ जिल्ह्यांमधील २ हजार ५०१ पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी मंगळवारी (दि. २३) जाहीर करण्यात आली. ही पदे जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात आली असून, प्रवर्गनिहाय सर्वांत जास्त पदे अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गासाठी ८४१ जागा ठेवण्यात येणार आहेत.

तर, इतर मागासवर्गीयांच्या ५२५ जागा भरण्यात आल्या आहेत, अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली.

राज्यात तलाठी संवर्गातील ४ हजार ६४४ पदे भरण्यासाठी जून २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित मागणीपत्रानुसार पदांची संख्या ४ हजार ७९३ इतकी करण्यात आली. या परीक्षेला राज्यातून १० लाख ४१ हजार जणांनी अर्ज केले. त्यांपैकी ८ लाख ६४ हजार ९६० जणांनी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ५७ सत्रांमधून ऑनलाइन परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

उर्वरित २३ जिल्ह्यांसाठी ६ जानेवारीला प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात प्रवर्गनिहाय २ हजार ५०१ पदांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक ८४१ पदे अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आली आहेत.

प्रवर्गनिहाय पदांची संख्या
अनुसुचित जाती ३२२
अनुसुचित जमाती १८३
विमुक्त जाती (अ) ८०
भटक्या जमाती (ब) ७३
भटक्या जमाती (क) ९४
भटक्या जमाती (ड) ५७
विशेष मागास प्रवर्ग ४८
इतर मागासवर्ग ५२५
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक २६८
अराखीव ८४१
एकूण २५०१

९५ पदे दिव्यांग, तर १६ पदे अनाथांसाठी
भरती करण्यात आलेल्या ५२५ जागा इतर मागासवर्गीयांसाठी आहेत. एकूण २ हजार ५०१ पदांपैकी ९५ पदे दिव्यांगांसाठी १६ पदे अनाथ उमेदवारांना देण्यात येणार आहेत.

पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शीपणे होण्यासाठी परीक्षेला बसलेला उमेदवार व रुजू होणारा उमेदवार एकच असल्याची खात्री, परीक्षेवेळी घेण्यात आलेल्या बायोमेट्रिक माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे. – सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त, पुणे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:24 27-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here