जरांगे-पाटलांसह मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी फसवलं : खा. विनायक राऊत

0

रत्नागिरी : सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची आवश्यकता होती, मात्र अध्यादेशामध्ये तसा उल्लेखदेखील नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना फसवलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला सुद्धा फसवलं आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.

ते रविवारी रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटील यांनी शांत बसू नये. आमची मागणी मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आहे. संसदेमध्येच यासाठी आरक्षणाचा कायदा पास करणे आवश्यक आहे. मात्र, आरक्षणाची ही सारवासारव टिकणारी नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण संसद देऊ शकते, याप्रकरणी दिलेला अध्यादेश परिपूर्ण नाही. निवडणुकीनंतर सरकार हा जीआर रद्द करण्याची शक्यता आहे, अशी टीका देखील खासदार राऊत यांनी केली.

इंडिया आघाडीतील एक अग्रणी नेते म्हणून नितीशकुमार होते. त्यांनी अचानकपणे भाजपशी केलेली सोयरिक म्हणजे हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या देशवासीयांचा त्यांनी विश्वासघात केला आहे, अशी टीकादेखील खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली आहे. नितीशकुमार यांचे भाजपसोबत जाणे म्हणजे लोकशाहीला घातक आहे. सत्तेसाठी गेलेले आता एकमेकांवर आरोप करत आहेत. अजित पवार गटामध्ये हा बेबनाव सुरू झालेला आहे. उद्या शिंदे गटातही सुरू होईल. लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी शिंदे गटाच्या लोकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातील, औट घटकेचं हे सरकार असल्याची टीका यावेळी खासदार राऊत यांनी केली.

नितेश राणे हे खूप मोठे विश्वगुरू आहेत. त्यांच्या अंगात नेतेपद एवढं भिनलेलं आहे, काही दिवसांतच त्याचा कपाळमोक्ष होईल, अशी टीकादेखील खासदार राऊत यांनी यावेळी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 29/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here