खेड : खेड तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेत 88 लाख 32 हजार 555 रुपयांचा अपहार झाला होता. या प्रकरणी सोमवारी पोलिस ठाण्यात तत्कालीन बारा कर्मचारी व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालीन सचिव सुरेश महादेव साळुंखे, विश्वास बळवंत पाटील, सहसचिव रमेश सुरेश कवडे, चेअरमन मनोहर बाळकृष्ण शेलार, संचालक विलास भिकू गुहागरकर, बाळाराम पांडुरंग शिर्के, प्रशांत नारायण माजलेकर, योगेश सतीश मापारा, सुशांत सतीश कदम, संचालिका शामल शामराव मोरे, कविता तुकाराम कडू व अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2008 या कालावधीत संस्थेत कार्यरत असणारे सचिव, चेअरमन आणि संचालकानी संगनमताने खोटी कर्जप्रकरणे तयार करून बोगस कर्जाचे वाटप केले होते. कर्जावरील व्याज वसूल करताना ते कमी रुपये आकारून कर्ज रक्कम कर्ज खतावणी रजिस्टरला जमा म्हणून नोंदविली होती. मात्र, रोजकिर्दीमध्ये रकमेच्या नोंदी न घेता रोजकीर्दीला कर्ज वाटप, परंतु कर्ज खतावणीमध्ये कमी रकमेच्या नोंदी केल्या. जमा पावतीमध्ये नोंद करण्यात आलेली रक्कम रोजकिर्दीमध्ये जमा न करता 88 लाख 32 हजार 555 रुपयांचा अपहार करुन संस्थेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी या संस्थेच्या बारा जणांविरुद्ध लेखा परीक्षक सुनील सासवडकर यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.
