”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना टोपी घालून शेंडी लावली”

0

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकराने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे बोलले जात आहे.

तर, आरक्षणाची लढाई मराठे जिंकले असल्याचा दावा खुद्द जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, यावरच प्रतिक्रिया देतांना ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना टोपी घातली असून, त्यांना शेंडी लावली असल्याचं हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत.

दरम्यान याबाबत बोलतांना हरिभाऊ राठोड म्हणाले की, “कायदा पास झालेला नाही. पूर्वीपासून रक्त नातेसंबंधानुसार सुविधा मिळत असतात. जे मिळालं तो कायदा नाही. सरकारने नवीन काहीही केलेलं नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे यांना टोपी घातली अमी शेंडी लावली आहे. झालेला निर्णय म्हणजे फसगत असल्याचे देखील राठोड म्हणाले आहेत.

भुजबळांवर हल्लाबोल…

दरम्यान याचवेळी बोलतांना हरिभाऊ राठोड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. “छगन भुजबळ दिखावा करत आहेत. काल पास केलेल्या ठरावांचं काहीही होणार नाही. मागासवर्गीय आयोगावर कुठलंही आक्षेप घेता येत नाही. भुजबळांनी आक्षेप घेतला, पण त्याचा काहीही उपयोग नाही. भुजबळ रथयात्रा कशासाठी काढत आहे. भुजबळ हेच समाजाची फसवणूक करत आहेत. भुजबळांनी सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकावा, ते मुख्यमंत्री होतील असेही राठोड म्हणाले आहेत. तर, भुजबळांना आरक्षणात फारसं कळत नाही असेही राठोड म्हणाले.

फडणवीसांवर टीका…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते, ओबीसींना धक्का लागू देणार नाही. आमचा डीएनए ओबीसी असल्याचे म्हणत होते. मग आता कुठे गेले ओबीसी डीएनए, ओबीसींना धक्का लागला असल्याचे कुणलाही सर्वांना कळत असल्याचे राठोड म्हणाले.

बबनराव तायवाडेंनी पलटी खाल्ली…

दरम्यान याचवेळी हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यावर देखील टीका केली आहे. “तायवाडे आम्हाला अभ्यास करायला सांगत आहेत. तायवाडे मराठा नेते आहेत का?, त्यांची बाजू घेत आहेत. असा ओबीसी नेता असू शकत नाही. त्यामुळे तायवाडे यांनी पलटी खाल्ली असल्याचे राठोड म्हणाले.

जरांगेंची ओबीसी नेत्यांवर टीका…

मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. “ओबीसी नेते बैठक घेत आहे, पण आता काहीच होणार नाही. आता राजपत्र निघालेलं आहे. भुजबळ यांना तेच काम आहे. लोकांच्या अन्नात माती कालवण्याचं काम आम्ही करत नाही. ओबीसी नेते आमच्यावर अन्याय होत असल्याचं म्हणत आहे. मात्र, आमच्यावर देखील खूप दिवस अन्याय झाला असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच ओबीसी नेते आंदोलन करत असतील तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे” सुद्धा जरांगे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here