अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा

0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने याबाबत अधिसूचना काढली यामुळे आंदोलन काही दिवस स्थगित करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर ओबीसी नेत्यांची बैठक झाली. दरम्यान, अधिसूचनेविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी यावर मंडल आयोगाला चॅलेंज देणार असल्याचा इशारा दिला आहे.

‘कायदा टीकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आहे. त्यांच्या माझ्याजवळ सह्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत काही दगाफटका झाला तर मी मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना दिला. ओबीसी नेत्यांनी फक्त ही याचिका दाखल करुदेत मीही मंडल कमिशनला चॅलेंज करणार. मी आहे तोपर्यंत पुन्हा मराठ्यांसाठी लढा उभा करेन, असंही जरांगे पाटील म्हणाले.

काल ओबीसी नेत्यांची बैठक

काल मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आता भुजबळ यांनी राज्यात एल्गार यात्रेची घोषणा केली आहे. तसेच सगेसोयरे मसुद्याविरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहनही केले आहे.

“आपण आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी बाहेर पडले पाहिजे. यासाठी एक तारखेला आमदार किंवा खासदार आणि तहसिलदार यांच्याकडे ओबीसी आरक्षणाच्या बाचावाच्या मागण्या देतील. लाखोंच्या संख्येने ओबीसी बाहेर पडा. आमदार आणि खासदारांना आपण बोललं पाहिजे. मतदानासाठी त्यांनी ओबीसींची गरज आहे. आपण सगळ्यांनी त्या त्या मतदार संघातील आमदारांकडे जायचे आहे, असं आवाहन भुजबळ यांनी केले.

‘तसेच सगेसोयरेंचा काही मसुदा पाठवला आहे. त्याच्यावर लाखो हरकती आम्ही दाखल करणार आहोत. तसेच ३ फेब्रुवारीला अहमदनगरला एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच जे लोक वकील आहेत त्यांनी कोर्टात उभ रहावे. कोर्टाला आपण आपली बाजू पटवून दिली पाहिजे. कार्याकर्त्यांनी वकीलांना संपर्क साधला पाहिजे, आपण ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढायची आहे. याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली.

या राज्यात ओबीसी भटक्या विमुक्त समाज हा ५४ चक्के आहे. तसेच शेड्युल कास्ट तसेच इतर समाजातील लोक यांना माझी विनंती आहे. हे आंदोलन झुंडशाही विरोधात आहे. हे आज ओबीसीवर आले आहे, उद्या कोणावरही येऊ शकेल याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हीही या, अशी आम्ही विनंती करत आहोत, असंही भुजबळ म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here