राजापूर : ओणी-अणुस्कुरा मार्गाची दुरवस्था

0

राजापूर : दिवसागणिक वाहतुकीची वर्दळ वाढलेल्या ओणी अणुस्कुरा मार्गाची दुरवस्था झाली आहे. सौंदळसह काही ठिकाणी खराब बनलेल्या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होणार? असा सवाल आता वाहन चालकांसह प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

गेले दोन वर्षे ओणी-अणुस्कुरा मार्गावरील वाहतुकीची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे मुंबई पुण्यासह महानगरातील चाकरमानी तळकोकणात ये-जा करण्यासाठी अणुस्कुरा घाटाचा अवलंब करीत असल्याने ओणी – अणुस्कुरावरील वाहतूक वाढली आहे.

सततच्या वाहतुकीमुळे या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. सौंदळ रेल्वेस्थानक परिसरात पावसाळी दिवसांत अतिवृष्टीनंतर बाजूलाच असलेल्या नदीला येणाऱ्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर आजुबाजूला पसरत असे. रस्त्यावरसुध्दा पुराचे पाणी असायचे. परिणामी काही काळासाठी वाहतूक बंद पडायची. त्यामुळे गतवर्षी त्या परिसरात तीन मोन्यांसह भराव टाकून रस्त्याची उंची वाढविण्यात आली होती. पावसाळ्यात भराव टाकलेला तो भाग किती खचतो, त्यानंतरच त्या मार्गाची दुरुस्ती केली जाणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले होते.

अपेक्षेप्रमाणे गत पावसाळ्यात तो भाग कमी खचला असला तरी त्या ठिकाणी खडे मात्र पडले आहेत. त्या परिसरातून वाहणाऱ्या नदीवरील कमी उंचीच्या पुलाची उंची वाढविण्यात आल्याने त्या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून तेथून वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्या पुलावर देखील खड्डे पडले आहेत. रस्ताही खराब बनला आहे.

आणखी एक दोन ठिकाणी असेच प्रकार घडले आहेत. पावसाळा संपून अडीच ते तीन महिने लोटले तरी या मार्गावरील दुरुस्तीला मुहूर्त मात्र सापडलेला नाही. वाढत्या वाहतुकीमुळे रस्ता आणखी खराब बनत आहे. तर दुसरीकडे खराब बनलेल्या मार्गावरून वाहने चालविणे तारेवरील कसरत बनली आहे.

संबंधित विभागाने तत्काळ या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी आता वाहन चालकांसह परिसरातील प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:58 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here