महाराष्ट्रात एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार, 83,900 रोजगार संधी उपलब्ध होणार

0

मुंबई : हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्प या दोन्ही क्षेत्रात सोमवारी एकाच दिवशी 3,16,300 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून 83,900 रोजगार उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, कृषी मूल्य साखळी अंतर्गत शेतकर्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांच्याशी करार करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे सामंजस्य करार सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यातील उर्जा क्षेत्रात एकूण 7 कंपन्यांशी हरित ऊर्जा निर्मितीसाठी 2,76,300 कोटी रुपयांचे करार करण्यात आले. यातून 63,900 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यात एनटीपीसी ग्रीन एनर्जी लि. (एकूण गुंतवणूक 80,000 कोटी/12 हजार रोजगार), जेएसडब्ल्यू एनर्जी लि. (एकूण गुंतवणूक 15,000 कोटी/11 हजार रोजगार), अवादा ग्रीन हायड्रोजन प्रा. लि. आणि बाफना सोलार अँड इन्फ्रा. प्रा. लि. (एकूण 50,000 कोटी रुपये गुंतवणूक/8900 रोजगार), रिन्यू ईफ्युएल प्रा. लि. (एकूण गुंतवणूक 66,400 कोटी/27 हजार रोजगार), वेल्सपन गोदावरी जीएच2 प्रा. लि. (एकूण गुंतवणूक : 29,900 कोटी/12,200 रोजगार), आयनॉक्स एअर प्रॉडक्टस (एकूण गुंतवणूक 25,000 कोटी रुपये/300 रोजगार) आणि एल अँड टी ग्रीन एनर्जी टेक लि. (10,000 कोटी रुपये गुंतवणूक/1000 रोजगार) यांचा समावेश आहे.

दुसरा सामंजस्य करार महाराष्ट्रात हरित पोलाद प्रकल्पासाठी करण्यात आला. आर्सेलर मित्तल निप्पॉन इंडिया आणि महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाशी झालेल्या या करारात एकूण 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. हा करार सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या दोन्ही करारांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषीमूल्य साखळी भागिदारी बैठकीत उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सर्वांत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले, ज्याची आमच्या शेतकरी बांधवांना गरज आहे, ते कृषी विभागाचे आहेत. यात अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांच्यासमवेत करार झाले. यामुळे शेतकरी आपला कृषीमाल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. आजच्या संपूर्ण दिवसातील हा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.

राज्य सरकारने कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा आता प्रारंभ केला आहे. सबसिडीतून, नुकसानभरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना 2014-19 या काळात करण्यात आल्या. शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट यासारख्या योजनांची आखणी झाली. वातावरणपूरक शेती हाही प्रयत्न झाला. शेतकर्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा जोडण्याचा निर्णय झाला. त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रारंभ करण्यात आल्या. हा पुढचा टप्पा प्रारंभ केल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन. राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here