राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती

0

मुंबई : राष्ट्रवादी (NCP) आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकांनी म्हटलं की, मंगळवारी आणि बुधवारी या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल 31 तारखेला हे प्रकरण क्लॉज फॉर ऑर्डर करण्यात येईल.

त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार असल्याचंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यास 15 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आलाय. त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणानंतर लवकरच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर देखील येत्या काही दिवसांत निकाल लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांकडून पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला. तसेच या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात देखील सुनावणी सुरु आहे.

ठाकरे, आव्हाडांनी नियमाला धरुन बोलावं – राहुल नार्वेकर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा थेट अमान्य करत विरोधकांनी टीका केली. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांकडून यावर सातत्याने भाष्य करण्यात येत असून राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला जात आहे. याला प्रत्युत्तर देताना राहुल नार्वेकरांनी म्हटलं की, मी वारंवार त्यांना सांगितलं तुम्ही बिनबुडाचे आरोप करत आहात. मी जो निर्णय दिलाय त्यामध्ये कायदेशीर रित्या काय चुकीचं आहे, दे दाखवून देण्याची धमक ना ठाकरेंमध्ये आहे, ना राऊतांमध्ये ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार?

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे. पण तो निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान राजकीय वर्तुळात हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, पण अद्यापही हा निकाल लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची धाकधुक सध्या वाढलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुरु असलेली सुनावणी आठ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला होता. मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here