घरात ‘नो गॅझेट झोन’ बनवा; रात्री जेवताना मोबाइल नको, पंतप्रधान मोदींचं ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये आवाहन

0

नवी दिल्ली : पालकांनी आपल्या घरामध्ये ‘नो गॅझेट झोन’ आणि ‘रात्रीच्या जेवणादरम्यान मोबाइल वापरायचा नाही’ या प्रकारचे काही नियम करावेत. तसेच घरातील सदस्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सर्व फोन्सचे पासवर्ड प्रत्येकाशी शेअर करावेत.

यामुळे अनेक वाईट गोष्टी थांबतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.

भारत मंडपम येथे आयोजित सातव्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञानाला ओझे समजू नये, परंतु त्याचा वापर एखाद्याच्या फायद्यासाठी कसा करायचा हे शिकणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना ॲपद्वारे ‘स्क्रीन टाइम’वर लक्ष ठेवण्याचा सल्लाही दिला.

२.२६ कोटी
विद्यार्थी आणि शिक्षकांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

३१.२४ लाख
विद्यार्थी आणि ५.६० लाख शिक्षक आणि १.९५ लाख पालकांनी गेल्या वर्षी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

इतर मुलांची उदाहरणे देऊ नका
बरेच पालक आपल्या मुलांना इतर मुलांची उदाहरणे देत असतात. पालकांनी या गोष्टी करणे टाळावे. आम्ही हेदेखील पाहिले आहे की ज्या पालकांना त्यांच्या आयुष्यात फारसे यश मिळाले नाही, त्यांच्या यशाबद्दल जगाला सांगण्यासारखे काही नाही, ते त्यांच्या मुलांचे प्रगतिपुस्तक त्यांचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ बनवतात, हे चांगले नही. कोणीही भेटला की मग ते त्याला त्यांच्या मुलांची गोष्ट सांगतील, असेही मोदी म्हणाले.

प्रगतिपुस्तक ‘व्हिजिटिंग कार्ड’ मानू नये
मुलांना दडपणाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्यामध्ये लवचिकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांना तोंड द्यावे. मुलाचे प्रगतिपुस्तक स्वतःचे भेटकार्ड (व्हिजिटिंग कार्ड) मानू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिला.

बटन बंद केले की, तणाव नाहीसा झाला असे करू शकत नाही. विद्यार्थ्याने दबाव, तणाव सहन करण्यास सक्षम बनले पाहिजे. तणावासाठी स्वतःला तयार केले पाहिजे.

  • नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मी ३० सेकंदांत गाढ झोपी जातो
मी झोपल्यानंतर ३० सेकंदांत गाढ झोपेत जाण्याचा नित्यक्रम पाळला आहे. जेव्हा तुम्ही जागे होता त्यावेळी पूर्णपणे जागे होणे आणि झोपताना गाढ झोप घेणे हे मी संतुलन राखले आहे. विद्यार्थ्यांनी ‘स्क्रीन टाइम’पासून सावध रहावे, त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो, असे पंतप्रधान म्हणाले.

काय आहे मोदीमंत्र?
नेहमी अधिक हुशार आणि कठोर परिश्रम करणारे मित्र बनवा.
एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नये, कारण ते त्यांच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते.
तयारीदरम्यान लहान ध्येय ठेवा आणि हळूहळू तुमची कामगिरी सुधारा, अशाप्रकारे तुम्ही परीक्षेपूर्वी पूर्णपणे तयार व्हाल.
अनेक विद्यार्थी मोबाइल फोन वापरतात आणि काही तर तासन्तास वापरता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या झोपेचा वेळ रिल्स पाहण्यासाठी वापरू नये.
मोबाइल वापरण्यासाठीदेखील रिचार्ज आवश्यक आहे, त्याचप्रमाणे, आपल्या शरीरालादेखील रिचार्ज करणे आवश्यक.
मोबाइल फोन आणि लॅपटॉपच्या या युगात परीक्षांसाठी लिहिण्याचा सराव आवश्यक. लेखनाचा सराव करण्यासाठी किमान ५० टक्के वेळ द्या.
मित्रांशी नव्हे तर स्वत:शी स्पर्धा करा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here