विमानाने २४ विद्यार्थी ‘इस्त्रो’ च्या सफरीवर

0

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित डॉ. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षेतील प्रावीण्यप्राप्‍त 24 विद्यार्थी सोमवारी ‘इस्त्रो’ सफरीवर रवाना झाले. सोमवारी सायंकाळी गोवा विमानतळावर हे विद्यार्थी पोहोचले. मंगळवारी सकाळच्या विमानाने त्यांचा प्रवास केरळ राज्यातील इस्त्रो केंद्राच्या दिशेने होणार आहे. या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने 24 विद्यार्थ्यांना ब्लेझर, पॅन्ट व शूज देण्यात आले. बँकेच्या प्रधान कार्यालयात  हे साहित्य वितरण व शुभेच्छा कार्यक्रम पार पडला. बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि. प.  अध्यक्ष संजना सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण सभापती अनिशा दळवी, महिला बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ,  समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षणाधिकारी एकनाथ  आंबोकर,  सरोज परब, बँकेचे सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई आदींसह विद्यार्थी, पालक व  बँकेचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. संजना सावंत म्हणाल्या, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा, यासाठी गेल्या वर्षीपासून जि. प. ने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे. यामध्ये तालुका निहाय एक ते तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना इस्त्रोची सफर घडविली जाते. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी  सिंधुदुर्ग ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे. सतीश सावंत म्हणाले, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी इस्त्रो सारख्या आंतराष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या सहलीला जाताना त्यांच्यात गरीब-श्रीमंत असा भेदभाव  राहू नये, यासाठी जिल्हा बँकेने गेल्या वर्षीपासून या विद्यार्थ्यांना ड्रेस देण्याचा निर्णय घेतला.  हे विद्यार्थी जागतिक पातळीपर्यंत टिकू शकतील यादृष्टीने पुढे प्रयत्न व्हायला हवेत. विद्यार्थ्यांमधून शिशिर मेहंदळे या मसुरे  शाळेतील विद्यार्थ्याने मनोगत व्यक्‍त केले. उत्कर्षा पावनोजी, तन्वी  सातार्डेकर, सुनया फडके, संज्ञा संपत नाईक आदी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्‍त करत जि. प. च्या उपक्रमाचे कौतूक केले.  जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई यांनीही मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी राजन आंगणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here