रत्नागिरी : राम जन्मभूमीवर इंग्रजांकडून १९०२ निशाण्यांचे दगड – आशुतोष बापट

0

रत्नागिरी : अयोध्येत वादग्रस्त इमारतीच्या पूर्व दरवाजाजवळ १९०२ साली इंग्रजांनी समारंभपूर्वक महसुली निशाण्यांचे दगड बसवले होते अशी माहिती पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक, संशोधक आशुतोष बापट यांनी दिली.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या व शेवटच्या व्याख्यानात ते बोलत होते. श्री. बापट म्हणाले की, या दगडांमध्ये क्रमांक १ राम जन्मभूमी आणि क्रमांक ५ रामजन्मस्थान यांची नोंद केली गेली. अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर होते, याची माहिती असल्यामुळे ब्रिटिशांनी ही नोंद केली. स्वातंत्र्यानंतर रामलल्ला प्रकटले, नंतर कुलुपबंद होते. परंतु उत्खनन, संशोधनातून आणि पुढे न्यायालयातील दावे, करसेवा, राम जन्मभूमी असे होत होत पाचशे वर्षांनंतर राम मंदिर दिमाखात उभे राहिले, असे श्री. बापट म्हणाले. सन १५२८ मध्ये बाबर अयोध्येत आला. इसवी सन १७२२ मध्ये सादत खान सुभेदार झाला. त्याने मुघल सत्ता झुगारून स्वतःची सत्ता स्थापन केली. १८५८ पर्यंत अयोध्येवर नबाबांची सत्ता होती. १८५६ वाजीद अलीला हटवून अयोध्येची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीने घेतली. त्यावेळी डब्ल्यू. एच. स्लीमन हा कंपनीचा अधिकारी होता. १८५८ मध्ये निहंग फकीर खालसाने राममूर्ती बसवल्या. एक महिना सर्व परिसर त्याच्या ताब्यात होता. महंत रघुबीर दास यांनी मंदिर निर्मितीसाठी प्रयत्न केले, अशी माहिती श्री. बापट यांनी दिली.

बापट म्हणाले की, १९४७ ते ४९ दरम्यान सोमनाथ मंदिर उभे राहिले आणि २२ डिसेंबर १९४९ च्या मध्यरात्री रामलल्ला प्रकट झाले. मूर्तीची पूजाअर्चा सरकारी खर्चाने सुरू झाली. परंतु त्यानंतर रामलल्ला कुलुपात बंद केले गेले. १९८६ मध्ये कुलूप उघडले गेले व १९८९ मध्ये मंदिराचा शिलान्यास झाला. १९७५ ते ७७ या काळात पहिले उत्खनन केले गेले. त्यात के. के. मुहम्मद यांचा समावेश होता. २००२ मध्ये टोजो विकास इंटरनॅशनलने जीपीआर सर्वेक्षण केले. २००३ मध्ये बी. आर. मणी यांच्या नेतृत्वात उत्खनन करण्यात आले. त्यांनी इ. स. पूर्व १३०० पासून ते सोळावे शतक मुघल काळ असे नऊ भागांत वर्गीकरण केले. त्यामध्ये अनेक मूर्ती, नाणी, वस्तू, मकरप्रणाल, आमलक सापडले. २२ बाय १४ मीटरचा चौथरा आढळला. विष्णुहरी शिलालेख हा महत्त्वाचा पुरावा सापडला. राम मंदिरासाठी १९५० पासून अनेक दावे न्यायालयात दाखल झाले. हिंदू महासभा, निर्मोही आखाडा यांनीही दावे दाखल केले. १९८९ मध्ये श्री रामजन्मभूमी आणि जवळचा मित्र सखा या भूमिकेतून देवकीनंदन अगरवाल यांनी दावा दाखल केला. यातून रामलल्ला देवतेचे न्यायिक अस्तित्व आणि अधिकार प्रस्थापित झाला, असे बापट यांनी स्पष्ट केले.

व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, महाविद्यालय गेल्या वर्षापासून स्वायत्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे विषय घेता येतील. संस्कृत हा विषयसुद्धा फक्त कला शाखाच नव्हे तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनाही घेता येईल. यामुळे आपल्या आवडीच्या विषयात पदवी पूर्ण करता येईल. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले. यावेळी प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. स्नेहा शिवलकर आदींसह अनेक विद्वान मंडळी उपस्थित होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here