रत्नागिरी : नववे ग्रामीण साहित्य संमेलन शिपोशी येथे

0

रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेला शिपोशीचे सरपंच हरेश जाधव, डॉ. राजेंद्र शिंदे, दीपक नागवेकर, चंद्रकांत खामकर, महेंद्र साळवी, मंगेश चव्हाण, शहानवाझ सारंग उपस्थित होते.

यावेळी लाड म्हणाले की, संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार, संपादक विजय कुवळेकर भूषविणार असून पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. संघ आता अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. संघातर्फे राजापूर आणि लांजा तालुक्यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि भौतिक विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेली आठ वर्षे लांजा आणि राजापूर तालुक्यात आलटून पालटून तीन दिवसांचे साहित्य संमेलन घेतले जाते. त्यामध्ये दोन तालुक्यांच्या विकासात योगदान असलेल्या विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा शोध घेतला जातो आणि त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली जाते. पारंपरिक वेशभूषेत लेझिम, ढोलताशे, पथनाट्य घोडा-बैलगाडी असलेली ग्रंथदिंडी हे साहित्य संमेलनाचे आकर्षण असते.

यावर्षीचे साहित्य संमेलन शिपोशी येथील न्या. वैजनाथ विष्णू आठल्ये विद्यामंदिरात १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान असलेले देणारे जी. अण्णा, न्या. आठल्ये, पत्रकार जनुभाऊ आठल्ये आदी थोर पुरुषांचे हे जन्मगाव आहे. रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे प्राथमिक शिक्षण याच गावात झाले होते. याच गावच्या शाळेत शिक्षण घेतलेले ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर शिपोशीतील साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. कोकणच्या मातीत कोकणातल्या शेतकऱ्यांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणात ऊस पिकवून आणि कोकणात प्रथमच गुऱ्हाळ चालवून केवळ नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेल्या गुळाला जगाच्या बाजारात पोहोचविणारे कोकणचे सुपुत्र पितांबरीकार रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

लाड यांनी संमेलनातील सर्व कार्यक्रमांची तसेच दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची माहिती यावेळी दिली. कोकणात बंद पडणारी घरे ही मोठी समस्या असून ती पुन्हा गजबजावीत, यासाठी विवाह करून कोकणात आपल्या घरी राहणाऱ्या तरुण जोडप्यांचा सत्कार हे या संमेलनाचे वैशिष्ट्य असते, असे लाड म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here