झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर ३१ तासांनी समोर.., ईडी काही दिवसापासून घेत होती शोध

0

रांची : ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या चौकशीला टाळताना दिसत आहेत. सोमवारी ईडीचे पथक दिल्लीत दिवसभर त्यांचा शोध घेत होते, मात्र सोरेनचा यांचा शोध लागला नाही.

मुख्यमंत्री सोरेन आता अतिशय नाट्यमय पद्धतीने रांचीला पोहोचले आहेत. ते आमदारांची बैठक घेत आहेत. या बैठकीत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित आहेत. त्यांच्या जागी ते पत्नीला राज्याचे मुख्यमंत्री करू शकतात, अशी चर्चा आहे.

सोमवारी ईडीचे पथक दिल्लीतील त्यांच्या घरी पोहोचले, मात्र ते बेपत्ता असल्याचे आढळून आले. यानंतर ईडीने त्यांच्या घरातून २ बीएमडब्ल्यू कार आणि काही रोकड जप्त केली. ईडीची टीम वाट पाहत राहिली पण सीएम सोरेन यांचा काहीही पत्ता लागला नाही. तर त्यांचे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावरच उभे होते.

दुसरीकडे, भाजपने सीएम सोरेन यांना बेपत्ता मुख्यमंत्री म्हणून संबोधले असून झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे. हेमंत सोरेन यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे भाजप नेते निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

२७ जानेवारीला मुख्यमंत्री सोरेन रांचीहून दिल्लीला पोहोचले होते. जमीन घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी ईडीने त्यांना २९ ते ३१ जानेवारी दरम्यान चौकशी करण्यासाठी वेळ मागितला होता. सीएम सोरेन यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक २९ जानेवारीला त्यांच्या दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी पोहोचले. चौकशीदरम्यान ते घरात उपस्थित नव्हते. ईडीच्या टीमने सीएम सोरेन यांची १३ तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहिली. ईडीच्या टीमने सीएम सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेतली. यावेळी बीएमडब्ल्यू कार, ३६ लाख रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. सोरेन यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ईडीची टीमही विमानतळावर हजर होती. यासोबतच टीम झारखंड भवन आणि इतर काही ठिकाणीही गेली, पण मुख्यमंत्री सोरेन यांचा पत्ता लागला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here