शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार अनिल बाबर यांचे निधन

0

मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार अनिल बाबर (वय ७४) यांचे निधन झाले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. २०१९च्या निवडणूकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.

खानापूर तालुक्यातील गार्डी या छोट्याशा गावात दि. ७ जानेवारी १९५० रोजी आमदार अनिल बाबर यांचा जन्म झाला. कोणती ही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी गार्डी गावच्या सरपंच पदापासून आपला राजकीय संघर्षमय प्रवास सुरू केला. सरपंच ते विधानसभा सदस्य असा त्यांचा मोठा राजकीय संघर्षमय प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. खानापूर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्यपासून विधानसभा सभागृहात त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवला. शेतकऱ्यांसाठी टेंभू योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. प्रसंगी मंत्रीपदापासून दूर राहत केवळ शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी लढणारे सर्वसामान्यांचे नेते म्हणून आमदार अनिल बाबर यांच्याकडे पाहिले जात होते.

इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठीमोठे प्रयत्न-

आमदार अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी होते. खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. टेंभू योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी खानापूर, तासगाव, खटाव, सांगोला यासह अन्य तालुक्यातील टेंभूपासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे यासाठी टप्पा क्रमांक सहाचा मंजुरी प्रस्ताव सभागृहात मांडून त्यास मान्यता घेतली. गेल्या काही महिन्यापासून त्यांना प्रकृती अस्वस्थ जाणवत होते. मंगळवारी सकाळी त्यांना उपचारासाठी सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाचे वृत्त समजतात नातेवाईक व अनेक कार्यकर्त्यांनी सांगलीकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाने खानापूर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस अहोरात्र लढणारा नेता गेल्याने खानापूर मतदारसंघात शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here