तिलोरी कुणबी पोट जातीचा सर्व्हे करावा; चिपळुणातील कुणबी सेनेची तहसीलदारांकडे मागणी

0

चिपळूण : महाराष्ट्रातील तिलोरी कुणबी समाजास जातीचे दाखले तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावेत. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत इतर मागासवर्गीयांच्या यादीत कुणबी या मुख्य जातीचा समावेश आहे. तिलोरी कुणबी ही पोट जात असल्याने कुणबी तसेच तिलोरी कुणबी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच राजकीय मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. याशिवाय मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामधून सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी मागणी कुणबी सेनेने तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

राज्य शासन परिपत्रक, शासन निर्णय अनुच्छेद २५ नुसार इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट असलेल्या मुख्य जातीचा स्पष्ट संदर्भ असेल, तरच सक्षम प्राधिका-यांनी अशा पोट जातीच्या लोकांना मुख्य जातीची प्रमाणपत्र द्यावीत. इतर मागासवर्गीयांच्या यादीत कुणबी जातीचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीच्या कागदोपत्री तिलोरी कुणबी किंवा खैरे कुणबी असा शब्द प्रयोग असेल तरच त्या व्यक्तीस कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख असूनही महाराष्ट्रातील तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही. तिलोरी कुणबी समाज हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत पूर्वापार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तिलोरी कुणबी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच राजकीय मागासलेपण तपासण्यासाठी त्वरित सर्वेक्षण करावे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत, असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

निवेदन देताना कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष दीनानाथ रावणंग, जिल्हा सरचिटणीस प्रदीप उदेग, जिल्हा प्रवक्ता गजानन वाघे, तालुका प्रमुख संजय जावरे, शशिकांत वाघे आदी उपस्थित होते.

तर विषमतेची दरी निर्माण होईल
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास विषमतेची दरी निर्माण होऊन कुणबी-बहुजन समाज सामाजिक, शैक्षणिक, शासकीय नोकरीत तसेच राजकीय क्षेत्रातून हद्दपार होईल, हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे. त्यामुळे यापूर्वी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी काढलेले शासकीय परिपत्रक त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here