राज्य सरकारने योग्य टप्प्यावर उचित सन्मान केला; अशोक सराफ यांचे राज ठाकरेंकडून अभिनंदन

0

मुंबई : मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळणार असल्याचं घोषित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे.

अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक, असं राज ठाकरे ट्विट करत म्हणाले.

मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. पण अशोक सर ह्या बाबतीत देखील अपवाद ठरल्याचं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र भूषण सारखे राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कलाकरांना ते उमेदीत असताना मिळावेत असं मला वाटतं. अर्थात हे प्रत्येक वेळेला होतंच असं नाही पण अशोक सरांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य टप्प्यावर त्यांचा उचित सन्मान केला ह्याबद्दल राज्य सरकारचं पण मनापासून अभिनंदन, असं राज ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

‘जानकी’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण-

अभिनेते अशोक सराफ यांना प्रेमाने सर्वजण ‘मामा’अशी हाक मारतात. अशोक मामांचा जन्म १९४७ साली मुंबईतच झाला. १९६९ पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. ‘जानकी’ या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी ‘आयत्या घरात घरोबा’,’अशी ही बनवाबनवी’,’बाळाचे बाप ब्रह्मचारी’,’भूताचा भाऊ’,’धुमधडाका’सह ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. ‘सिंघम’ मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय ‘गुप्त’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’, ‘प्यार किया तो डरना क्या’ या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here