संविधानाच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निर्णय दिला तर आमच्याच बाजूने लागेल : सुप्रिया सुळे

0

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर विधिमंडळात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढही दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुणालाही विचारला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा असल्याचे सर्वांना माहिती आहे. संविधानावर आम्हाला विश्वास आहे. संविधानाच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यास अर्थातच तो शरद पवार यांच्या बाजूने असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.

मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काश्मीर ते कन्याकुमारी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. शरद पवार या पक्षाचे फाउंडर आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या युक्तिवादादरम्यान सर्व बाबी आम्ही पारदर्शकपणे मांडलेल्या आहेत. संविधानावर आम्हाला विश्वास आहे. संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय जर दिल्यास अर्थातच तो शरद पवार यांच्या बाजूने लागेल, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमध्येच कायम राहतील

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या राज्यापुरता घेतला आहे. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमध्ये कायमच राहतील. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला आहे तो वैयक्तिक निर्णय आहे. भाजपाला नैतिकता राहिलेलीच नाही. सत्तेसाठी ते काहीही करतील. त्यांचेच वरिष्ठ नेते अमित शाह असे म्हणले होते की, आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमारांबरोबर आघाडी करणार नाही. हे मी म्हटलेले नाही. सोशल मीडिया आणि चॅनलवर अमित शाह यांचे स्टेटमेंट फिरत आहे. त्यामुळे मला असे वाटते नैतिकता ही भारतीय जनता पक्षाकडे होती ती पूर्णपणे या नवीन भारतीय जनता पक्षाने घालवलेली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रात देशात अनेक कर्तुत्वान लोक आहेत त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच कमतरता महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे. आरक्षण, महागाई, बेरोजगारी असेल अशी एवढे मोठे गंभीर प्रश्न आज राज्य आणि देशाच्या समोर आहेत. २०० आमदार आणि ३०० खासदार असूनही हे पूर्णपणे या सरकारचे अपयश आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here