हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान देऊ दाखवाच; छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा

0

मुंबई : मंडल आयोगाला त्यांनी आव्हान द्यायला हवे. त्यांच्याएवढा ज्ञानी कुणी नाही. ज्याला लाख आणि कोटी समजत नाही ते मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करतायेत.

जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावे. हे माझे चॅलेंज आहे असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचे जे जाणकार आहेत त्यांचे म्हणणं आम्हाला वेगळे आरक्षण द्या, कुणबी म्हणून देऊ नका असं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठी कायदा बनलेला आहे. त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन आहे. मात्र तरीही मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्रे देण्याचं काम सुरू आहे. या झुंडशाहीपुढे नमते घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे. भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला धक्का न लागता तुम्हाला ज्यांना आरक्षण द्यायचे आहे ते द्या. पण आमचे आरक्षण कशाला धक्का लावताय?, ते एका मराठा जातीसाठी लढतायेत, मी एका वर्गासाठी लढतोय, जो मागास आहे असं भुजबळांनी म्हटलं.

तसेच कोणाला कितीही आरक्षण द्या, पण भटक्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ओबीसीत ३७५ जाती आहेत त्यासाठी माझा लढा आहे. ओबीसी नेत्यांची २ दिवसांपूर्वी बैठक झाली. राज्यभरात ओबीसी एल्गार कार्यक्रम ठरलेला आहे. १६ तारखेपर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवायच्या आहेत. आमचा जो कार्यक्रम ठरला आहे त्यानुसार पुढे जाऊ. मागच्या दाराने कुणी प्रवेश देत असेल तर त्याची चर्चा करून थोडी देणार आहे. आमच्याकडे तक्रारी येतायेत त्यावर आम्ही बोलतोय. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, कारण कॅबिनेटमध्ये ठरलेले विषय असतात, अजेंडा असतो. त्यानुसार कॅबिनेट चालते, माझा अजेंडा ओबीसी बचाव हा आहे. ओबीसीवर जर अन्याय होतोय हे स्पष्टपणे दिसतंय. ओबीसी आरक्षण संपुष्टात येतंय. कारण त्यात संपूर्ण मराठा समाज कुणबी दाखले घेऊन मागच्या दाराने प्रवेश देण्यात आले आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या हे आम्ही बोलतोय. आमदार ते मंत्र्यांपर्यंत आमची बाजू मांडणे, आमची कैफियत कोर्टात मांडणे, लोकांमध्ये रॅली, आक्रोश करणे, संविधानाने जे काही आम्हाला अधिकार दिलेत त्यानुसार आमच्यावर जो अन्याय होतोय त्याविरोधात आम्ही आयुधे वापरू असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही ठिकाणी माझे फोटो फाडले, पुतळा जाळला जातो. गेल्या ३-४ दिवसांपासून उन्मादी उत्सव सुरु आहे. जिथे ओबीसी घरे आहेत तिथे त्रास द्यायचा हा प्रकार गावागावात सुरू आहे. जिथे १-२ घरे ओबीसीची आहेत ते घरे सोडून चाललेत. आरक्षण मिळाल्याचा उन्मादी उत्सव, ओबीसीविरोधात शिवीगाळ देत गाणी सुरू आहेत. हे माध्यमांसमोर येत नाही. ही भयंकर परिस्थिती राज्यात दुर्दैवाने निर्माण झाली. कायद्याच्या चौकटीत काय बरोबर, काय चूक हे पाहू पण लोकांना त्रास का दिला जातोय असा गंभीर आरोप छगन भुजबळांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here