परमबीर सिंह यांच्याविरोधातील तपास बंद करा, पुरावे नसल्याने सीबीआयचा अहवाल

0

मुंबई : खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

काय आहे पार्श्वभूमी

परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या संदर्भात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजवून दिली होती. वेगवेगळ्या महत्त्वाच्या हॉटेल आणि बारमधून वसुली करायला लावली जाते, खंडणी गोळा करायला लावली जाते, असे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. त्यानंतर परमबीर सिंह आणि इतरांविरुद्ध खंडणी वसुल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. मात्र गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर म्हणजे २०२१ मध्ये तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे.

आपल्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. २०१६-१७ मध्ये घडलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे उपलब्ध झालेले नाहीत वा आक्षेपार्ह काहीही आढळलेले नाही, असे सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे सदर तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.

परमबीर सिंह यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणी प्रकरणी जुलै २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता सीबीआयने पुराव्यांअभावी तपास बंद करण्यासाठी अहवाल सादर केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here