कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करू नयेत म्हणूनच नारायण राणेंची भाजप प्रवेशाची हूल

0

कणकवली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करू नयेत यासाठीच नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी उठवलेली ती हूल आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या केवळ वावड्याच आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खुशाल भाजपमध्ये यावे. शिवसेना-भाजप युती होणारच आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष माजी आ. प्रमोद जठार यांनी दिली. सिंधुदुर्गात ‘सी वर्ल्ड’ प्रकल्प होणारच असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. कणकवलीतील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते संदेश पारकर, तालुकाध्यक्ष संदेश पटेल उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी आपली निवड झाल्यानंतर कोकणातील पाच जिल्ह्यात पर्यटनाचे 15 मेगाप्रोजेक्ट उभारण्याचा आपण संकल्प केला आहे. पर्यटनाचे सर्कीट निर्माण करून पर्यटन विकासाला चालना देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. सी वर्ल्ड प्रकल्प, जंगल सफारी, योगापार्क, आंबोली हिलस्टेशन, कासार्डे सालवा डोंगर, राजापूरातील माचाळ असे पर्यटन स्पॉट आपल्या विचाराधीन आहेत असे ते म्हणाले. प्रमोद जठार म्हणाले, कणकवलीमध्ये सुरूवातीला 13 कोटीचा बॉक्सवेल रस्ता होणार होता, मात्र शहराची गरज लक्षात घेऊन केंद्रीयमंत्री नितीन  गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत हायटेंशन सींगल पिलर उड्डाणपूल मंजूर करून घेतला. त्याचे बजेट 113 कोटी आहे. सिंधुदुर्गात तळेरे, कणकवली आणि कुडाळ येथे हे उड्डाणपूल होत आहे. कणकवली उड्डाणपूलाला आप्पासाहेब पटवर्धन, तळेरे येथील पूलाला वामनराव महाडिक आणि कुडाळ येथील पुलाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी ना. गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप नेते संदेश पारकर यांनी झाराप ते खारेपाटण ज्या ठिकाणी हायवेवर खराब पोर्शन आहे त्यावर पावसाळी डांबरीकरण करावे, कणकवलीत गणेश चतुर्थी कालावधीसाठी ज्या ठिकाणी सध्या काम सुरू नाही त्या दोन पीलरमध्ये बॅरिगेट्स काढून टाकून विविध विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here