भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

0

नवी दिल्ली : सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या अल नईम आणि एफव्ही इमाम या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाने सुटका केली. दोन दिवसांत दोन इराणी मच्छिमार नौकांचं अपहरण झालं होतं.

नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने या दोन्ही नौकांची यशस्वीरित्या सुटका केलीय. अल नईमवर 19 पाकिस्तानी खलाशी होते. तर इमामवर 17 इराणी खलाशी होते.

28 जानेवारीला इमाम या नौकेकडून अपहरण झाल्याचा एसओएस कॉल नौदलाला आला. आयएनएस सुमित्रा तातडीने मदतीला धावून गेली. इमामची सुटका झाल्यावर काही वेळातच अल नईम या नौकेचं अपहरण झाल्याचा दुसरा कॉल आला. आयएनएस सुमित्रावरच्या नौसैनिकांनी आणि कमांडोंनी साहसी कारवाई करत अवघ्या 36 तासांत अपहरणाचे दोन कट उधळले. 36 खलाशांची सुटका केली. सोमालियाच्या समुद्री चाचांना अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

19 पाकिस्तानी, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या जहाजानं सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर समुद्री चाच्यांचा डाव उधळून लावत एफ व्ही इमान या जहाजाची सुटका करून चाचेगिरी विरोधात आणखी एक यशस्वी मोहीम आपल्या नावे केली आहे. या मोहिमेत आय एन एस सुमित्राने मासेमारी जहाज अल नईमी आणि त्यातील कर्मचाऱ्यांची (19 पाकिस्तानी नागरिकांची) 11 सोमाली चाच्यांपासून सुटका केली.

आय एन एस सुमित्रा, हे भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे किनारी गस्ती जहाज असून सोमालिया आणि एडनच्या आखाताच्या पूर्वेला चाचेगिरी आणि सागरी सुरक्षा कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी ते तैनात करण्यात आले आहे. समुद्री चाच्यांनी इराणचा ध्वज असलेले मासेमारी जहाज (एफ व्ही) इमानवर चढाई करून त्यातील कर्मचारी आणि सदस्यांना ओलिस ठेवले होते, यासंदर्भातील संदेश प्राप्त होताच आय एन एस सुमित्राने 28 जानेवारी 2024 रोजी त्याला तात्काळ प्रतिसाद दिला. आय एन एस सुमित्राने एफ व्ही इमानला रोखून मानक संचालन प्रणालीनुसार कारवाई करत हे जहाज आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची (17 इराणी नागरिक) 29 जानेवारी 2024 च्या पहाटे सुरक्षितपणे सुटका करण्यात आली, एफ व्ही इमानचे निर्जंतुकीकरण केल्यावर त्याचा पुढील प्रवास सुरु झाला.

त्यानंतर, पुन्हा एकदा आय एन एस सुमित्राने आणखी एका जहाजाच्या मदतीसाठी धाव घेतली. इराणचा ध्वज असेलेले मासेमारी जहाज अल नईमी, ला शोधून त्या जहाजाची चाच्यांपासून सुटका करण्याच्या कामगिरीवर आय एन एस सुमित्रा लगेच तैनात झाले. अल नईमी ला देखील समुद्री चाच्यांनी वेढले होते आणि त्यातील (क्रू) कर्मचाऱ्यांना (19 पाकिस्तानी नागरिक) ओलीस ठेवले होते. या जहाजावर घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज घेत आणि अतिशय शीघ्र कृती करत आय एन सुमित्राने 29 जानेवारी 2024 रोजी जहाजाला रोखून धरले आणि आणि आपल्या बळाचा वापर करत हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साहाय्याने यशस्वी कारवाई करून 11 समुद्री चाच्यांना मासेमारी जहाज अल नईमी आणि त्यातील कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करायला भाग पाडले. याशिवाय जहाजाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आणि सोमाली समुद्री चाच्यांनी बंदिवान केलेल्या क्रू सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आय एन एस सुमित्राने थांबा घेतला होता.

आय एन एस सुमित्राने, कोचीच्या पश्चिमेला अंदाजे 850 नॉटिकल मैल दक्षिण अरबी समुद्रात, 36 तासांपेक्षाही कमी कालावधीत, शीघ्रता, चिकाटी आणि अथक प्रयत्नांद्वारे 36 क्रू (17 इराणी आणि 19 पाकिस्तानी) सदस्य आणि दोन अपहृत मासेमारी जहाजांची सुटका केली आणि भविष्यात व्यापारी जहाजांवरील चाचेगिरीसाठी होणाऱ्या या मासेमारी जहाजांच्या गैरवापराला देखील प्रतिबंध केला. भारतीय नौदलाने या प्रदेशात सर्व संभाव्य सागरी धोक्यांचा सामना करण्यासाठीची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, ज्यामुळे समुद्रातील सर्व खलाशी आणि जहाजांची सुरक्षा सुनिश्चित होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here