उद्धव ठाकरे यांची तोफ आज रायगडात धडाडणार!

0

रायगड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आजपासून दोन दिवस रायगडात धडाडणार आहे. जनसंवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या 1 फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग आणि रोहे तर 2 फेब्रुवारी रोजी पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव येथे सहा झंझावाती सभा होणार आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सलग दोन दिवसांच्या या ऐतिहासिक सभांची शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा रायगड जिह्यात 1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जिह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या प्रथमच सलग सहा सभा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या स्वागताची रायगड जिह्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी केली आहे. भगवे झेंडे, बॅनर्स आणि भगव्या स्वागत कमानी लक्षवेधक ठरल्या आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवसेना नेते सुभाष देसाई व शिवसेना नेते अनंत गीते हेही उपस्थित राहणार आहेत. दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, मध्य रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, सहसंपर्कप्रमुख आणि पदवीधर मतदारसंघ यंत्रणाप्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क संघटक ज्योत्स्ना दिघे, जिल्हा संघटक डॉ. स्विटी गिरासे, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, रोहे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

मराठी मुस्लिम सेवा संघाचे शिलेदारही उपस्थित राहणार

उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी म्हसळा येथे होणाऱ्या सभेस मराठी मुस्लिम सेवा संघाचे शेकडो शिलेदार उपस्थित राहणार आहेत. मराठी मुस्लिम सेवा संघ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष फकीर महम्मद ठाकूर यांनी ही माहिती दिली. देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेले सुडाचे राजकारण पाहता महाविकास आघाडीला मजबूत करण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या सभेस शेकडो मराठी मुस्लिम बांधव उपस्थित राहतील, असे ठाकूर यांनी सांगितले.

1 फेब्रुवारी

सकाळी 11 वाजता – पेण शहर हायस्कूलजवळ, पेण

दुपारी 3 वाजता – चौल-अलिबाग

सायंकाळी 6 वाजता – उरुस मैदान, रोहा

2 फेब्रुवारी

सकाळी 11 वाजता – देवीची सहान, पोलादपूर

दुपारी 3 वाजता – म्हसळा शहर, दिघी रोड

सायंकाळी 7 वाजता – गांधी मैदान, माणगाव

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here