कोकण रेल्व्ये मार्गाचे महत्व आपत्ती काळात

0

रत्नागिरी : आधी मुसळधार पावसामुळे मार्गालगत भरलेले पाणी, त्या पाठोपाठ भूस्खलनाच्या घटनांमुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या दक्षिणेतील अनेक रेल्वे गाड्यांना यावेळी कोकण रेल्वेमुळे  मोठा दिलासा मिळाला. मुंबईतून पुणेमार्गे दक्षिणेतील राज्यांमधील त्रिवेंद्रम, नागरकोईलकडे जाणार्‍या अनेक गाड्या या कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात आल्या. यामुळे कोकण रेल्वे मार्गाचे महत्त्व आपत्ती काळातही किती आहे, ही बाब अधोरेखित झाली आहे. मुंबईतून पुण्याकडे जाणार्‍या रेल्वे मार्गावर कल्याणच्या आधी कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस दि. 27 जुलै रोजी अडकून पडल्याची घटना घडली. या   घटनेपाठोपाठ या मार्गावरून कल्याण, पुणे, दौंडमार्गे दक्षिणेकडील म्हैसूर, बंगळुरूसह कोचुवेलीच्या दिशेने जाणार्‍या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर, मुंबई  सीएसटी-चेन्न्नई, मुंबई सीएसएमटी-त्रिवेंद्रम तसेच  पुणेमार्गे तमिळनाडूमधील नागरकोईल तसेच कन्याकुमारीपयर्र्ंत धावणार्‍या  एक्स्प्रेस गाड्यांसाठी आपत्तीकाळात  जवळपास 10 दिवस कोकण रेल्वे  मार्ग हा उत्तम पर्यायी मार्ग ठरला. पर्यायी मार्गे कोकणातून धावलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चेन्नई एक्स्प्रेससह अजमेर – म्हैसूर,  जोधपूर – बंगळुरू तसेच कन्याकुमारी एक्स्प्रेसचाही समावेश आहे. दि. 4  ऑगस्ट रोजी मध्य  रेल्वेच्या आपटा ते जिते स्थानकादरम्यान मार्गावर दरड आल्याने कोकण रेल्वेलाही फटका बसला होता. यामुळे ‘कोरे’ला आपल्या मार्गावरील अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्याने मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. मात्र,  मुसळधार पाऊस, पूरस्थिती अशाही स्थितीत कोकण रेल्वेने आपल्या मार्गावरून प्रवास निर्धोक ठेवल्याने  नेहमी अन्य मार्गाने प्रवास करणार्‍या गाड्यांमधील हजारो प्रवाशांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुखाचा  प्रवास घडविला.   रोहा ते ठोकुर दरम्यानच्या 738 कि.मी.च्या या रेल्वे मार्गावर 24 तास  सुरु  असलेली गस्त तसेच सुरक्षा उपाययोजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च यामुळे कोकण रेल्वेला हे शक्य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here