रत्नागिरी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी अहवालामध्ये अनेक विद्यार्थ्यांना गंभीर आजार असल्याचे पुढे आले आहे. यामध्ये १८ विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा आजार असून १२ विद्यार्थ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर १०३ विद्यार्थ्यांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचे निदान करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शालेय आरोग्यतपासणीकेलीजाते. जुलै २०१९ अखेर जिल्ह्यातील शाळांमधील ९६ हजार ४५६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यात विविध आजारांनी त्रस्त असलेल्या आठ हजार विद्यार्थ्यांवर औषध उपचार शाळेतच करण्यात आले. अन्य आरोग्य शिबिरेही घेण्यात आली. यात २ हजार ४१८ विद्यार्थ्यांना संदर्भसेवेकरीता निवडण्यात आले. यापैकी २ हजार ३३७ विद्यार्थ्यांवर संदर्भसेवेमध्ये औषध उपचार करण्यात आले. संदर्भ, सेवा शिबिरामध्ये तपासणीअंती अंगणवाडीमधील ४१ विद्यार्थी सॅम श्रेणीत तर ३८० विद्यार्थी मॅम श्रेणीत असल्याचे आढळून आले.१०३ विद्यार्थ्यांना इतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात आले. यापैकी ९० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडीतील सर्वाधिक ६२ जणांवर तर पहीली ते बारावी पर्यंतच्या २८ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. १३ विद्यार्थ्यांवर अद्याप शस्त्रक्रिया करण्यात आलेली नसून, या विद्यार्थ्यांवर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना हर्णिया, अपेंडीस, एएनटी, हृदयरोग यासारखे आजार असल्याचे निदान करण्यात आले.
