लंडन शहराचे माजी महापौर आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे ((हुजूर पक्ष)) नेते बोरिस जॉन्सन यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. त्यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडी घेत विद्यमान परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांच्यावर मात केली. जॉन्सन हे बुधवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
जॉन्सन यांना ९२ हजार १५३ (६६ टक्के) तर, त्यांचे प्रतिस्पर्धी जेरमी हंट यांना ४६६५६ मते मिळाली. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या एकून १ लाख ५९ हजार ३२० सदस्यांमधील ८७.४ टक्के सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी अंतर्गत झालेल्या निवडणुकीतील मते सोमवारी लंडनच्या पक्ष मुख्यालयात पाठविली गेली. शिल्लक मतदारांना प्रत्यक्ष किंवा कुरियरने स्वतःचा निर्णय कळवावा लागला. कॉन्झर्व्हेटिव्ह होम संकेतस्थळाकडून शुक्रवारी आणि शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या १ हजार १९९ सदस्यांच्या एका ऑनलाईन सर्वेक्षणात ७३ टक्के जणांनी जॉन्सन यांना पसंती दर्शविली आहे. जॉन्सन यांनी ३१ ऑक्टोबर रोजी ब्रिटनला युरोपीय महासंघापासून विभक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
५५ वर्षीय बोरिस जॉन्सन हे बेक्झीटचे समर्थक आहेत. सध्याच्या पंतप्रधान टेरेसा मे आता इंग्लंडच्या महाराणी ऐलिझाबेथ द्वितीय यांना आपला राजीनामा पाठणार आहेत. मात्र, त्याआधी मे यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये अखेरच्या अधिवेशनात पंतप्रधान म्हणून सहभाग घ्यावा लागणार आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सोमवारी सकाळी सीओबीआर आपत्कालीन स्थिती समितीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत आखातातील जहाजांच्या सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.