रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी मानाचा व प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सोमवारी मुलाखती पार पडल्या. एकूण २३ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दरवर्षी शासनातर्फे आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांचा ५ सप्टेंबर रोजी या शिक्षकदिनी आदर्श पुरस्कार देऊन गौरव केला जातो. हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जात असल्याने यामध्ये अनेकवेळा राजकारण व सेटींगचे गणित होते. काहीवेळा यामुळे पुरस्काराच्या वितरणाचा मुहूर्तही चुकल्याचे प्रकार घडले आहेत. हा पुरस्कार मिळवण्यासाठी शिक्षकांमध्ये स्पर्धा असते. या पुरस्कारासाठी शिक्षकांमधून प्रस्ताव मागितले जातात. प्रत्येक तालुक्याला एक व एक विशेष अशा एकूण दहा जणांना हे पुरस्कार दिले जातात. मात्र दरवर्षी ५० पेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त होतात. यामुळे प्रत्येक तालुक्यातून प्रस्तावांची छाननी करून तीनच प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवले जातात. हे प्रस्ताव पाठवल्यानंतर आदर्श पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून या प्रस्ताव पाठवलेल्या शिक्षकांची मुलाखत घेतली जाते. सोमवारी या मुलाखती जि. प. भवनात पार पडल्या. एकूण २३ जण मुलाखतीला हजर होते. या समितीमध्ये जि. प. अध्यक्ष स्वरूपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांचा समावेश होता. या पुरस्काराचे ५ सप्टेंबर रोजी वितरण होणार आहे. या मुलाखतीचा अहवाल कोकण आयुक्तांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर कोकण आयुक्तांकडून हे पुरस्कार जाहीर होणार आहेत.
