एसटी बसस्थानकाच्या हायटेक प्रकल्पाला कोरोनाचा फटका

0

रत्नागिरी : एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाला कोरोनाचा फटका बसला आहे. रेंगाळलेल्या या कामाला गती देण्याच्यादृष्टीने हालचाली झाल्या. परंतु मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. कामगार मिळेनासे झाले आणि कामगार आणण्याचे धाडस केले तर ठेकेदाराचे थकलेले 40 लाखाचे बिल मिळेना. त्यामुळे जनतेशी थेट संबंधित असलेला हा 10 कोटीचा नूतन बसस्थानकाचा प्रकल्प अनिश्‍चित कालावधीसाठी थांबला आहे. हायटेक बसस्थानकाचा 10 कोटीच्या या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांसमोर झाले. आराखड्यामध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. शॉपिंग सेंटर किंवा व्यापारी गाळे आत ठेवण्याऐवजी दर्शनीभागी उभारून एसटी आत आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग करण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार नवीन आराखडा करून प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूरच्या ठेकेदाराला याचा ठेका देण्यात आला. सुरवातीला काम चांगल्या पद्धतीने सुरू होते. परंतु त्यानंतर ते रेंगाळत गेले. यामुळे बदलण्यात आलेल्या एसटी वाहतूक व्यवस्थेवरून अनेक वाद निर्माण झाले. प्रवाशांना थांब्यावर निवारा शेडचीही व्यवस्था नव्हती. तसेच बसस्थानकासमोरील थांब्यावर प्रवाशांची गर्दी होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली. एसटी पार्किंगसाठी पालिकेकडे मागण्यात आलेली जागादेखील पालिकेने नाकारली. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच गाड्या पार्किंग करून ठेवल्या जाऊ लागल्या. ठेकेदाराला त्यामुळे कामात अडथळे येऊ लागेल. कामाची गंती मंदावली. अखेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून सामंत यांनी स्वतः कामाची पाहणी केली. या वेळी ठेकेदाराची चांगलीच कानउघाडणी करून त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती केली. त्यानंतर कामाला काहीशी गती मिळाली. परंतु कोरोना महामारीचे संकट आले आणि कामाला पुन्हा खो मिळाला. जेवढे कामगार होते ते कोरोनाच्या भीतीने निघून गेले. तसेच ठेकेदाराने केलेल्या कामाचे सुमारे 40 लाखाचे बिलदेखील एसटी महामंडळाकडून अजून अदा झालेले नाही. बीओटी तत्त्वावर काम करण्यापेक्षा एसटी महामंडळामार्फत हे काम सुरू आहे; मात्र बिल न मिळाल्याने आणि कामगार उपलब्ध होत नसल्याने ठेकेदाराने काम थांबविले आहे. गेले पाच महिने हे काम बंद असून सुरू होण्यास अनिश्‍चित कालावधी लागणार आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:02 PM 20-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here