रत्नागिरी : चिपळूण शहरात वाढलेल्या चोऱ्या व महिला सुरक्षेच्यादृष्टीने गेल्या अनेक वर्षापासून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असतानाच, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज चव्हाण यांनी चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. शहरात तब्बल २६ ठिकाणी ५९ कॅमेरे व पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसवण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षात चिपळूण शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. व्यापारीदृष्ट्या कोकणातील चिपळूण हे प्रगत शहर आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या चोरट्यांची संख्याही वाढली आहे. गणेशोत्सव, सुट्ट्यांच्या हंगामात कोकण रेल्वे व एसटी स्टॅण्डवर चोऱ्यांची संख्या गेल्या तीन-चार वर्षात वाढली आहे. काही दिवसापूर्वी पूर परिस्थिती असतानाही चोरट्यांनी चिपळूण शहरात धुडगूस घातला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी धुळ्यातील टोळी अटक केली होती. चोरट्यांप्रमाणेच महिलांबाबतचे गुन्हे, अपघात करुन पळून जाणे यासारख्या घटनांसह सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्हीचा वॉच असणे अनिवार्य आहे. वर्षभरापूर्वी चार-पाच ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले, एसटी स्टॅण्डवरही सीसीटीव्ही बसल्याने, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. सीसीटीव्हीमुळेच गाजलेला रामदास सावंत खून प्रकरण उघडकीस आणण्यात यश आले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनीही सीसीटीव्ही बसवण्याबाबत चिपळूण नगर पालिकेशी चर्चा केली होती. शहरामध्ये नाईट व्हिजन कॅमेरे शहरातील २६ ठिकाणी ५९ कॅमेरे व बारा ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसवण्याबाबत पत्र व्यवहार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. नवीन पोलीस वसाहत, मध्यवर्ती एस.टी स्टॅण्ड, मंडल कार्यालय चिपळूण, काणेबंधू हॉटेलसमोर दिपक वॉचजवळ, पुजा थिएटर समोर, गांधी चौक, नाथ पै चौक, ताकीया मशिदजवळ, बांदल हायस्कूलसमोर, मेहता पेट्रोलपंप व कृष्णा स्वीटमार्ट साई मंदिरजवळ पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
