पंतप्रधान मोदी रिंग मास्टर, त्यांना हवे तसे ते काँग्रेसला नाचवतील; प्रकाश आंबेडकरांची टीका

0

अकोला : आगामी निवडणुकांच्या पूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकी आणि काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

त्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असताना आणि या सगळ्या घडामोडी पाहता ते भाजपच्या वाटेवर (BJP) असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

कुणाच्या जाण्याने पक्षाला फरक पडत नसतो

अशोक चव्हाण यांच्या देलेल्या आमदारकी आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम्या संदर्भात भाष्य करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपाला असं वाटत असेल की या निर्णयामुळे आपण सेफ होऊ. मात्र मला हे फार कठीण वाटतं. याचं कारण असं की, एखादी नेता त्या पक्षाला सोडून गेला कि त्या व्यक्तीलाच फार त्रास होतो. आमच्याकडे असलेले अनेक आमदार, मंत्री होते हे देखील आम्हाला सोडून गेले. मात्र पक्ष म्हणून त्याचा फार परिणाम झाला, असे नाही. सोडून गेलेल्या व्यक्तीच्या जवळचे मित्र किंवा संपर्कात असलेले तेच फक्त त्या ठिकाणी जात असतात. मात्र पक्ष हा कायम होता तिथेच असतो. त्यामुळे एखाद दुसरा व्यक्ती जाणं हे धक्कादायक आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र त्याच्या जाण्याने पक्षाला फरक पडतो, असे अजिबात नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर

मला व्यक्तिगत असे वाटत नाही की या सर्व परिस्थितीचा मतदानावर परिणाम होईल. राज्यात 60 ते 70 टक्के लोकांनी आपले मत कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही, याबद्दल विचार करून ठेवलेला आहे. भाजपला वाटतं तसं होईल असे अजिबात नाही. मी यापूर्वी देखील अनेकदा म्हणालो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहे. ईडीच्या चौकशीवर त्यांना हवे त्याने ते नाचवणार. मग ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ असतील किंवा तळागाळातील असतील. त्यांना ते नाचवल्या शिवाय राहणार नाही, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

देशभरात साडेचारशे धाडी

कालचीच एक बातमी जी सर्वांसमोर आली नाही. ती म्हणजे काल देशभरात साडेचारशे धाडी टाकण्यात आल्या. या धाडी राजकीय नाही. मात्र या धाडी टाकण्यामागील कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते कितीही बोलत असले की आम्ही चारशेचा आकडा गाठू हे केवळ एका भीतीपोटी बोलण्यात येत असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एका बाजूला भीती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या धाडी टाकण्यात येत आहे. ज्यामध्ये राजकीय आणि बिना राजकीय लोक, व्यापारी आदींवर देखील या धाडींमधून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जागावाटप संदर्भात अद्याप तरी माझे कोणाशी बोलणे झालेले नाही. जे आमचे ठरलेले आहे, त्या प्रमाणात आगामी काळात होईल असा विश्वास देखील प्रकाश आंबेडकर यांनी बोलतांना व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 12-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here