खेड : खेडमधील लोटे एमआयडीसीतून रासायनिक सांडपाणी खुलेआम खाडीत सोडल्यामुळे येथील सोनपात्रा नदी प्रदूषित झाली आहे. हिरवट आणि लाल रंगाचे पाणी आणि त्यावर तेलकट तवंग पाहायला मिळत आहे. तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून लोटे एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांमधून सोडलेल्या सांडपाण्यामुळे खेडमधील सोनपात्रा नदी प्रदूषित झाली आहे.त्यामुळे कोतवाली, सोनगाव, घाणेखुंट गावामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोटे एमआयडीसीमधील रासायनिक सांडपाणी हे सामूहिक सांडपाणी प्रकल्पातून प्रक्रिया होऊन नंतर एका पाइपलाईनने दाभोळच्या खाडीत सोडले जाते. मात्र, रासायनिक सांडपाणी थेट नदीतून वाहत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या विभागात अनेकवेळा मासे आणि जलचर मरण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दोन दिवसांपासून खेडमधील सोनपात्रा नदीत अशाप्रकारे उघड्यावर रासायनिक सांडपाणी सोडले जात असून नदीचा रंग बदलून गेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकारी अद्याप घटनास्थळी पोहोचला नसल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. याच नदीच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्यावतीने सहा महिन्यांपूर्वी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी ना. रामदास कदम यांनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करीत हा निधी मिळविण्यास पाठपुरावा केला होता. त्यानंतर या शुद्धीकरण कामाचे भूमिपूजनही त्यांच्याच उपस्थितीत करण्यात आले होते. नदीच्या शुद्धीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील झाला. मात्र, लगेच पावसाने हजेरी लावली आणि लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडायला सुरुवात केली. आंदोलने, उपोषणे करून देखील प्रदूषण करणाऱ्यांवर शासन जरब बसवत नसल्याने आपण ना. कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे दर्यासारंग मच्छीमार भोई समाजाचे अध्यक्ष सुनील जाधव, विजय जाधव, रघुनाथ पारधी, वसंत पारधी, रत्नाकर महाकाळ, प्रवीण भालेकर, शांताराम बदकर, ग्रामस्थ गणेश पेवेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
