रत्नागिरी : शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहिम रत्नागिरी नगर परिषदेने पुन्हा हाती घेतली आहे. दोन दिवसांमध्ये पंधरा मोकाट गुरे पकडण्यात आली. पालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आलेल्या काही गुरांच्या मालकांनी दंड भरून गुरे सोडवून नेली. मात्र अजून अपेक्षेप्रमाणे गुरांचा उपद्रव कमी न झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. शहरामध्ये मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे नागरिक आणि वाहनधारक प्रचंड हैराण झाले आहेत. अनेक दिवसांपासून ही समस्या कायम होती. शहरानजिकच्या गावातील गुरे देखील सकाळी आणि सायंकाळी कळपाने शहरात येतात आणि उशिरापर्यंत शहरातील कचराकुंड्या, उकीरड्यावर ठाण मांडून राहतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढली आहे. मांडवी, तेलीआळी नाका, बसस्थानक, मारूती मंदीर, साळवी स्टॉप आदी भागात मुख्य रस्त्यांवर ही गुरे बसलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. हॉर्न दिला आणि हाकलले तरी हलत नाहीत. यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दखल घेतली. गुरे पकडण्याचा ठेका एका संस्थेला दिला आहे. दोन दिवसांपासून त्या संस्थेच्या सदस्यांनी रात्रीच्या वेळी गुरे पकडण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसात १५ गुरांना पकडून कोंडवाड्यात ठेवले होते. त्यापैकी जवळच्या गावातून आलेल्या गुरांचाही समावेश होता, गुराच्या मालकांनी पालिकेशी संपर्क साधुन योग्य तो दंड भरून गुरे परत नेली. मात्र मोहीम पुढे अशीच सुरू राहणार आहे. असे असले तरी वाहतूक कोंडीची समस्या अजूनही कायम आहे.
