मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल 121 कि.मी. लांबीची समुद्रकिनारपट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खार्या पाण्यातील मासेमारी केली जाते. या खार्या पाण्यातील मासेमारीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थकारण अवलंबून आहे. आता मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 पेक्षा अधिक असलेल्या मोठ्या तलावांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन घेण्यासाठी व्यापक पाऊल टाकण्यात आले आहे. सोमवारी या मोहिमेचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केला. कांदळगावच्या तलावात मत्स्यबीज सोडण्यात आले. जिल्ह्यात तलावांमध्ये 1 हजार हेक्टर पेक्षा अधिक जलक्षेत्र आहे. यात टप्प्याटप्प्याने मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. गोड्या पाण्यातील या मत्स्योत्पादनामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणात भरीव वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कोकणातील असा पहिलाच उपक्रम मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे राबविण्यात येत आहे. निलक्रांती विविध कृषी मत्स्य, पर्यटन व पत सेवा सहकारी संस्था मालवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा मुळदे येथील गोड्या पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्प याच्या संयुक्त विद्यमाने कांदळगाव येथील प्रगतशील शेतकरी भूषण सुर्वे यांच्या जागेतील हंगामी तलावात कटला आणि रोहू जातीच्या मत्स्यबीजाची मत्स्यबोटुकली आकारांपर्यंत वाढीच्या प्रायोगिक चाचणीचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे सरासरी 3500 मि.मी. एवढा पाऊस पडतो. या पावसाच्या पाण्याचे अनेक भागात हंगामी तलाव तयार होतात. परंतु या तलावाच्या पाण्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग केला जात नाही. जिल्ह्यात सुमारे 25 लघुपाटबंधारे तलाव, 2 मध्यम पाटबंधारे तलाव असून या खाली सुमारे 1000 हेक्टर एवढे जलक्षेत्र आहे. तसेच जिल्ह्यात शासनाच्या शेततळी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततलाव तयार झालेले आहेत. या तलावात बारमाही मत्स्यसंवर्धनास वाव आहे. परंतु जिल्ह्यात यापुर्वी मत्स्यबीज निर्मिती होत नसल्याने या पाणी साठ्याचा योग्य वापर होत नव्हता पर्यायाने येथील गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन नगण्य आहे. आता या नव्या प्रयोगामुळे मत्स्योत्पादन वाढेल असा विश्वास डॉ. पांढरपट्टे यांनी व्यक्त केला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मुळदे येथील मत्स्यशेती प्रकल्पाअंतर्गत नुकतेच मत्स्यबीज निर्मिती केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेले असून यातून मोठ्या प्रमाणावर मस्त्यबीज तयार केले जाते. परंतु बीजाला योग्य आकारापर्यंत वाढविण्याच्या सुविधा येथे पुरेशा प्रमाणात नसल्याने शेतकर्याला मोठ्या आकाराचे बीज तलावात साठवणूकी करीता उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात पावसाळी हंगामात तयार होणार्या तलावात सदरचे बीज वाढवून शेतकर्यास फायदेशीर होवू शकेल का? याची पडताळणी करण्याकरीता कोकण प्रांतात प्रथमच कातळावरील पावसाची हंगामी तलावात भारतीय प्रमुख कार्प मासळीच्या बीजाची बोटुकली आकारापर्यंत वाढ तपासण्याकरीता प्रक्षेत्र चाचणी कांदळगाव येथील भुषण सुर्वे यांच्या जागेतील तलावात घेण्यात येत आहे. या चाचणीकरीता निलक्रांती सहकारी संस्थेचे समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी पुढाकार घेवून नियोजन केलेले आहे. मुळदे येथील मत्स्यबीज केंद्रात तयार करण्यात आलेले सुमारे 30 हजार नग मत्स्यबीज या तलावात जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडण्यात आले. सुमारे 30 ते 35 दिवसांच्या कालावधीनंतर या बीजाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण तपासण्यात येणार आहे. सदरची चाचणी यशस्वी झाल्यास पुढील वर्षापासून जिल्ह्याच्या इतर भागातील हंगामी तलावात अशा प्रकारचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्याचा विचार करण्यात येईल असे यावेळी मुळदे मत्स्यप्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत व रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. ही प्रायोगीक चाचणी मुळदे मत्स्यप्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत आणि सहकारी याच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली आहे. यावेळी डॉ. सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी डॉ. मनोज घुघूसकर, कृपेश सावंत, निलक्रांतीचे कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, शेतकरी भुषण सुर्वे, उमेश कोदे, उपसरपंच बाबल आयकर, ज्योती तोरसकर, अविनाश खानोलकर, विश्वास मूळये, तुषार गवळी, शांताराम कांदळगावकर, सुशांत सुर्वे, अमोल परब, आशिष आचरेकर, गजानन सुर्वे,सत्यवान भोगले, नितीन परब, राकेश कदम, सुरेश परब, सिद्धांत उपसकर, मनीष मांडवकर आदी व इतर उपस्थित होते.
