‘चांद्रयान -2’ चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश

0

नवी दिल्ली : भारत आता अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक घटनेच्या जवळ पोहोचला आहे. ‘चांद्रयान-२’ने आज, मंगळवारी ९ वाजून २ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. ७ सप्टेंबरला या यानातील लँडर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरेल व त्यावेळी एक नवा इतिहास घडवला जाईल. ‘चांद्रयान-२’ने आज चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश करून महत्वाचा टप्पा पार केला असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. आता पुढील महत्वाचा टप्पा म्हणजे ऑर्बिटरपासून लँडर वेगळे होणे हा आहे. हा टप्पा २ सप्टेंबर रोजी पार होईल. ३ सप्टेंबर रोजी लँडरचे काम सामान्यपणे चालू आहे का हे पाहिले जाईल. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर लँडिंग करेल, असे सिवन यांनी सांगितले. २२ जुलैला आंध प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण करण्यात आले होते. हे यान २३ दिवस पृथ्वीच्या वेगवेगळ्या अंतरांवरील कक्षेत भ्रमण करीत होते. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी त्याला सहा दिवस लागले. या यानाने आता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून ते १३ दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील आधीच निश्‍चित केलेल्या ठिकाणी त्यामधील लँडर सॉफ्ट लँडिंग करील. अर्थातच हे सॉफ्ट लँडिंग या मोहिमेतील सर्वात मोठे आव्हानात्मक काम आहे. चंद्रावर वातावरण नाही आणि गुरुत्वाकर्षणही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे. त्यामुळे हे लँडर चांद्रभूमीवर उतरवण्यासाठी ‘इस्रो’च्या संशोधकांचे कौशल्य पणाला लागणार आहे. प्रत्येक सेकंदाला दीड किलोमीटर इतक्या वेगाने फिरत असलेल्या ऑर्बिटमधून चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे हे किती कठीण काम ठरू शकते याची कल्पनाच केलेली बरी! शिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठे खड्डे, विवरे असून त्यांचा धोका अधिक आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here