साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करा

0

मुंबई: महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कोकणात पावसाच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तेथील नागरिकांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय अनेक दहीहंडी उत्सव आयोजकांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक आयोजकांनी दहिहंडीचा कार्यक्रम रद्द करुन कार्यक्रमात होणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आयोजकांनी उत्सव रद्द न करता अत्यंत साधेपणाने व पारंपारिक पद्धतीने उत्सवाचे आयोजन करण्याची विनंती दहीहंडी समन्वय समितीकडून पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. दहीहंडीच्या उत्सवाच्या माध्यमातून मिळणाऱ्या बक्षिसांमधूनही पुरग्रस्तांना मदत करणार असल्याची घोषणा दहीहंडी समन्वय समितीने केली आहे. तसेच दहीहंडी उत्सव नुकताच न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर आला असून गेल्या 3- 4 महिन्यांपासून सर्व दहीहंडी पथके सराव करत आहेत. त्यामुळे दहीहंडी आयोजकांनी उत्सव रद्द न करता उत्सवाचे आयोजन पारंपारिक पद्धतीने करण्याची विनंती दहीहंडी समन्वय समितीने पत्रकार परिषदेत केली. तसेच दहीहंडी मंडळाने विमा काढला नसेल तर आयोजकांनी त्या पथकांना थर लावण्यास देऊ नये असे आवाहन देखील समितीने केले आहे. दरवर्षी मुंबईत मोठ्याप्रमाणात लहान मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. त्यातील प्रमुख हंड्यांचा खर्च हा काही कोटींच्या घरात असतो. परंतु यावर्षी पश्चिम उपनगरातली आमदार प्रकाश सुर्वे, घाटकोपरची आमदार राम कदम तसेच वरळी येथील सचिन आहिर आयोजित दहीहंडी रद्द करुन पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here