नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Indian Wing Commander Abhinandan) यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी कमांडो अहमद खान (Ahmad Khan) याला भारतीय सैनिकांनी ठार केले आहे. अहमद खान हा नियंत्रण रेषेवरुन काही दहशतवाद्यांसह भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र भारतीय सैनिकांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडत त्याला ठार केले आहे.
अहमद खानने यापूर्वीही नौशेरा, सुंदरवनी, पल्लनवाला आणि इतर आजूबाजूच्या सेक्टर्समधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले होते. भारतीय क्षेत्रात दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत व्हावी म्हणून त्याला या ठिकाणी ठेवण्यात आले होते.
मात्र भारतीय जवानांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला.
दरम्यान नुकतंच भारत आणि पाकिस्तानमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान पाकिस्तानने पूंछमधील कृष्णा घाटीमधून बॉम्ब फेकले. याच वेळेस पाकिस्तानचे काही दहशतवादी नियंत्रण रेषेवरुन भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. याच दरम्यान पाकिस्तानी कमांडो अहमद खान याला ठार करण्यात आले.
