रत्नागिरी – पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा आणि अतिवृष्टीमध्ये खचलेल्या आंबा घाटाचे दुखणे कायम राहणार आहे. मिर्या – नागपूर चौपदरीकरणामध्ये हा मार्ग येत असल्याने त्याच्या स्वतंत्र दुरूस्ती प्रस्तावाला खो मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरूस्तीसाठीचा 2 कोटी 80 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. दोन महिन्यात चौपदरीकरणाची निविदा निघणार आहे. मात्र घाटातील हा धोका कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत.
मुसळधार पावसामुळे आंबा घाटात भेगा पडल्या असून भूस्खलनाची भिती होती. या मार्गावरील वाहतूक एक दिवस पूर्ण बंद होती. घाटातील पन्नास मीटरच्या भागात परिस्थिती गंभीर होती. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येणारा हा एकमेव मार्ग असल्याने भाजी, दूध, इंधनाची वाहतूक ठप्प झाली होती.
