मुंबई : ‘गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी गावाकडे जाण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडून रेल्वे गाड्यांची मागणी केलेली नाही. ई-पास व इतर वाहतूक सुविधांचा पत्ता नाही. सरकारला कोकणी माणसाची सगळ्या बाजूने कोंडी करायची आहे का?,’ असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. गपणतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लाखो चाकरमान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. चाकरमान्यांना कोकणात जाता यावे यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या. अन्यथा, ‘लालबागच्या राजा’च्या भक्तांप्रमाणेच कोकणी माणसाचीही बाप्पाशी ताटातूट होईल, असं शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे. कोकणातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध साधने व निधी याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार असताना अन्न, गरम पाणी, शौचालये व औषधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्याबाबत साधा विचारही करण्यात आला नाही किंवा बैठकही घेण्यात आलेली नाही. सरकारच्या या बेफिकिरीमुळं गावकरी आणि चाकरमानी यांच्यात दरी निर्माण झाली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 24-Jul-20
