रत्नागिरी : श्रावण महिना संपत आल्याने आता गणेशोत्सवाचे वेध गणेशभक्तांना लागले आहेत. गणपती कारखान्यांमध्येही लगबग सुरू झाली आहे. अनेक कारखान्यांमध्ये आता मूतीर्र्ना रंगरंगोटी सुरू झाली आहे. घरगुतीबरोबरच सार्वजनिक मंडळांचे गणरायही सजू लागले असून, मंडळांचीही तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात 110 सार्वजनिक व तब्बल पावणेदोन लाख घरगुती गणेशोत्सवाची स्थापना होणार आहे. कोकण म्हटला की, गणेशोत्सव व शिमगोत्सव या दोन सणांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यातही गणेशोत्सव म्हटला की, अगदी ग्रामीण भागातही घराघरांचे सौंदर्य रंगरंगोटीने वाढत असते. श्रावण महिना संपत आला की, सर्वच घरांमध्ये गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात व त्यासाठी नियोजन आणि तयारीला सुरुवात होते. चाकरमान्यांना देखील कोकणात येण्याचे वेध लागतात. मुळात कोकण रेल्वेची तिकीट तीन महिने आधीच ‘बूक’ झाली असून, एस.टी. बसेसचे आरक्षणही गावोगावात जाण्यासाठी झाले आहे. घरगुतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही तयारी करु लागली आहे. यावर्षी पूर परिस्थितीमुळे यातील अनेक मंडळांनी साध्या पध्दतीने उत्सव साजरा करताना, जास्तीत जास्त मदत पूरग्रस्तांना देण्याचे नियोजन केलेले दिसत आहे. इकोफ्रेंडली गणेशोत्सव होण्यासाठीही ग्रामीण भागापासून शहरातील घरांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवासाठी आकर्षक वस्तूदेखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत. पोलीस यंत्रणेने महामार्गाबरोबरच एसटी, रेल्वेस्थानकातील बंदोबस्तात वाढ केली आहे. ठिकठिकाणी स्वतंत्र पथके, वायरलेस व्हॅन तैनात केल्या जाणार आहेत. घरगुती गणेशाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवही मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. जिल्ह्यात 110 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. रत्नागिरी शहरामध्ये तब्बल 26 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यात रत्नागिरीचा राजा, श्री रत्नागिरीचा राजा या मंडळे मोठी आहेत. पाऊणशे वर्षांची परंपरा असणार्या टिळकआळी गणेशोत्सव मंडळांसारखी सामाजिक उपक्रम राबविणार्या मंडळांनीही आगमनाची तयारी सुरू केली आहे.
