चिपळूण : एस.टी. महामंडळामध्ये डिझेल चोरीचे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार चिपळूण आगारात उघड झाला असून, येथील आगारप्रमुख संदीप पाटील यांनी डिझेल चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले असून एस.टी.तील राज्यभर असलेले डिझेल चोरीचे रॅकेट उघड करणे पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे. एस. टी. महामंडळ तोट्यात असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, त्यामध्ये एक मोठे कारण समोर आले आहे. एस.टी. डिझेल घोटाळ्याच्या चर्चा नेहमीच होतात. मात्र, चिपळूण आगारात आता डिझेलची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. डिझेल टँकरच्या चौथ्या कप्प्यामधून पाईपलाईन जोडून ती टँकरच्या चौथ्या टाकीत टाकून 12 हजार 970 रूपयांचे 200 लीटर डिझेल चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात याचा पर्दाफाश झाला. त्यामुळे यामध्ये राज्यस्तरावर मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. या प्रकरणी टँकर चालक मारूती कांबळे (36, पुणे) व तुषार काळभोर (38, लोणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत आगारप्रमुख संदीप पाटील यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या नुसार, रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे येथून चिपळूण आगारात डिझेल घेऊन टँकर दाखल झाला. हे डिझेल चिपळूण आगारात देत असताना तीन कप्प्यांमधील डिझेल तत्काळ रिकामे झाले तर चौथ्या टप्प्यातील डिझेल रिकामे करताना वेळ लागला. यानंतर आगारप्रमुखांना शंका आल्याने त्यांनी चालक कांबळे यांना याची विचारणा केली. यानंतर पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व हा धक्कादायक प्रकार पुढे आला. डिझेल टँकरच्या चौथ्या कप्प्यामध्ये सपोर्ट प्लेटमधून एक भोक करुन त्यास पाईपलाईन जोडून या पाईपलाईनचा कॉक इंजिनच्या कॅबिनेटला जोडण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तीच पाईपलाईन पुन्हा टँकरच्या टाकीत टाकण्यात आली होती. गेले तीन महिने हा प्रकार सुरू असल्याचे चौकशीत उघड झाले. डिझेल अपहार प्रकरणी राज्यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे यातून पुढे येत आहे. या बाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत.
