कणकवली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह सांगली, कोल्हापुर, सातारा या जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे मोठी हानी झाली. त्यात अनेक कुटुंबांची घरे, दुभती जनावरे, गोठे असा संपुर्ण संसार उध्वस्त झाला. महाराष्ट्रावर आलेल्या या संकटानंतर संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. सिंधुदुर्गचे उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी कै. नारायण उर्फ नाना मांजरेकर ट्रस्टच्या माध्यमातून 10 लाखांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बाप्पा मांजरेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 लाखाचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, ना. गिरीष महाजन, ना. चंद्रकांत पाटील, ना. महादेव जानकर आदी मंत्री व सहकारी उपस्थित होते. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कोकणातून अनेक हात पुढे आले. त्यामध्ये आत्तापर्यंतच्या मदतीत उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी 10 लाखाचा धनादेश देत सर्वात मोठी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. या मदतीमुळे पुरग्रस्तांना सरकारच्या माध्यमातुन मोठी मदत होणार आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांचे आभार व्यक्त केले. पूरस्थितीत होत्याचे नव्हते झालेल्या बांधवांना मदतीचा हात देताना सामाजिक बांधिलकी जोपासत ही मदत ट्रस्टच्या माध्यामातून देण्यात आली आहे, असे बाप्पा मांजरेकर यांनी सांगितले.
